जतच्या 75 गावांसाठी दहा-पंधरा स्वतंत्र पाणीपुरवठा योजना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ten to fifteen separate water supply schemes for 75 villages of Jat

जत तालुक्‍यासाठी 75 गावांसाठी बिरनाळ तलावातून एकच प्रादेशिक पाणी योजना सुरु करण्याच्या प्रस्तावावर अखेर फुली मारण्यात आली. ही अवाढव्य योजना पेलणार नाही, यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाल्यानंतर राज्य शासनाने जुना प्रस्ताव गुंडाळून ठेवण्याचा निर्णय घेतला. 

जतच्या 75 गावांसाठी दहा-पंधरा स्वतंत्र पाणीपुरवठा योजना

सांगली : जत तालुक्‍यासाठी 75 गावांसाठी बिरनाळ तलावातून एकच प्रादेशिक पाणी योजना सुरु करण्याच्या प्रस्तावावर अखेर फुली मारण्यात आली. ही अवाढव्य योजना पेलणार नाही, यावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाल्यानंतर राज्य शासनाने जुना प्रस्ताव गुंडाळून ठेवण्याचा निर्णय घेतला. 

आता या तालुक्‍यासाठी छोट्या-छोट्या दहा - पंधरा स्वतंत्र पाणी पुरवठा योजना होतील. त्यासाठी मैदानात उतरून सर्वेक्षण करा, पाण्याची शाश्‍वती निर्माण होईल याचे काटेकोर नियोजन करून आखणी करा, असे आदेश पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित सर्वच विभांगाना दिलेत. त्यानुसार दिवाळीनंतर सर्वेक्षणाला सुरवात होईल. आमदार विक्रमसिंह सावंत यांनी बैठक लावली होती. 

जत तालुक्‍यातील 75 गावांसाठी प्रादेशिक योजना दीर्घकाळ चर्चेत होती. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना बसवराज पाटील यांनी तो प्रस्ताव चर्चेत आणला. त्यावर खलही झाला. काही नेते कधी योजनेच्या बाजूने तर कधी विरोधात बोलत. राजकारणही तापले. भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी विरोध केला. तम्मनगौडा रविपाटील, सरदार पाटील यांनी सभेत चर्चा घडवली. 

आधी श्री. सावंत जिल्हा परिषद सदस्य असतानाही चर्चा झाल्या. ही अवाढव्य योजना चालणार कशी ? एका बिरनाळ तलावातून पाणी तालुक्‍याला पुरणार कसे? तो पाच ते सात वेळा भरावा लागेल, तेवढा कोण भरून देणार ? त्यासाठीचे वीज बील, कार्यान्वित करण्याचा खर्च परवडणार का? काही गावांनी पैसे थकवले तर संपूर्ण योजनाच अडचणीत येईल का, असे अनेक प्रश्‍न चर्चेत होते. रविपाटील यांनी प्रादेशिक अमान्य असल्याचा ठराव जिल्हा परिषदेत करून घेतला. 

अखेर आमदार श्री. सावंत यांनी राज्यातील सर्व विभागांची बैठक लावून विषयावर फुली मारली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांना विषय समजावल्यानंतर त्यांनी स्वतंत्र पाणी योजनेबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला. आता बिरनाळ, दोड्डनाल, सनमडी, संख, आरवक्की आदी तलावांचे सर्वेक्षण होईल. तेथे किती पाणीसाठा होईल, तेथून किती गावांना पाणी देता येईल, ते तलाव म्हैसाळ योजनेतून भरून देण्याची व्यवस्था वर्षातून डिसेंबर ते जून या काळात शाश्‍वत पद्धतीने होईल का, याचा विचार केला जाईल. त्याचे निश्‍चित नियोजन झाल्यानंतर स्वतंत्र पाणी योजनांना आराखडा तयार करून तो मंजुरीसाठी ठेवला जाईल, असे श्री. सावंत यांनी "सकाळ' शी बोलताना सांगितले. 

जत तालुक्‍यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कोणत्याही मार्गाने सुटावा, हीच आमची भूमिका आहे. 75 गावांची एकच योजना व्हावी, असा हट्ट कधीच नव्हता. स्वतंत्र पाणी योजना केल्या तरी त्या उत्तम चालवता येतील, फक्त सरकारने गतीने काम करावे आणि त्यासाठी तातडीने निधी द्यावा.
- संजय पाटील, खासदार 


संपादन : प्रफुल्ल सुतार 

loading image
go to top