आईचे वर्षश्राद्ध टाळून पूरग्रस्तांना दहा हजारांची मदत 

हेमंत पवार
रविवार, 11 ऑगस्ट 2019

पूरग्रस्तांना दहा हजारांचा धनादेश शरद पवार सुपुर्द केल्यानंतर डोंबे बंधूंच्या दातृत्वाचे पवारांनी काैतुक केले. 

कऱ्हाड : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी महापुराने चारी बाजूने वेढल्याने संपर्कहीन झालेल्या तांबवे गावची पूरस्थिती नियंत्रणात आल्यानंतर नुकतीच तांबवे येथे भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी अजून समाजात माणुसकी असून, संकटग्रस्तांना मदत करायची भावना आहे. त्यामुळे लोक मदत करतात. बारामतीत मी आवाहन केल्यानंतर एक कोटी रुपये काही वेळात जमले असे त्यांनी सांगितले. त्याची बातमी सोशल मीडियावर लगेचच व्हायरल झाली.

तांबवे गाव आठ दिवसांपासून महापुराचा सामना करत होते. दोन दिवसांपूर्वी पूर ओरसल्याने गावातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. गावाला पुरात बसलेल्या अस्मानी संकटाची जाण ठेवून तांबवेतील राजाराम तुकाराम डोंबे व रमेश तुकाराम डोंबे या बंधूंनी त्यांची आई कमल तुकाराम डोंबे यांच्या प्रथम स्मृतिदिनासाठी होणारा जेवणाचा खर्च थांबवून त्यापोटी दहा हजार रुपयांची रक्कम पूरग्रस्तांसाठी माजी केंद्रीय मंत्री पवार यांच्याकडे सुपूर्द केली. 

अश्रूंनी भरले डोळे 
आईच्या वर्षश्राद्धासाठी होणारा खर्च थांबवून तांबवेतील डोंबे बंधूंनी त्यासाठी खर्च होणारा दहा हजारांचा धनादेश रमेश डोंबे यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला. पवार यांनी दहा हजारांची मदत दिल्याबद्दल डोंबे यांच्या दातृत्वाचे कौतुक केले. त्या वेळी डोंबे यांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten thousand rupees help to flood victims by avoiding mother's anniversary