शिक्षक पुरस्काराला दहा वर्षांनंतर मुहूर्त 

रविकांत बेलोशे
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

महाबळेश्‍वर तालुक्‍यातील स्थिती ; राजकारण्यांच्या हस्तक्षेपामुळे गुरुजींची उपेक्षा.

भिलार : प्रशासनाची उदासीनता, संघटनांमधील हेवेदावे, राजकारण्यांचा हस्तक्षेप आणि अनेक वादामुळे तब्बल 10 ते 12 वर्षे महाबळेश्वर तालुक्‍यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला नाही. अनेक कारणांनी पाच सप्टेंबरचा आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम कित्येक वर्षे पंचायत समितीने राबवलाच नाही. यंदा मात्र, या पुरस्कारांना मुहूर्त मिळाला आहे. 
गेल्यावर्षी राज्य शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रमाची संधी महाबळेश्वर तालुक्‍यातील पुस्तकांच्या गावाला मिळाली होती. परंतु, ती काही कारणांनी हुकली तरी शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पुरस्कारप्राप्त शिक्षकांना भिलारमध्ये निमंत्रित करून वेगळा योगायोग घडवला. महाबळेश्वर तालुका पुस्तकांच्या गावातील सारस्वताच्या वर्दळीने जगाच्या नकाशावर पोचला. पण, याच तालुक्‍यात शिक्षक दिनानिमित्त तालुकास्तरावरील आदर्श शिक्षक पुरस्कारांना मात्र गेले काही वर्षांपासून ब्रेक लागला असल्याने शिक्षकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 
महाबळेश्वर तालुकास्तर आदर्श शिक्षक पुरस्कारांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्यासारखे दिसत होते. परिणामी प्रशासनाविरोधात शिक्षक वर्गात कमालीची नाराजी दिसून येत होती. 
महाबळेश्वर तालुका हा अतिदुर्गम व डोंगरपकपारीत वसला आहे. त्यामुळे या तालुक्‍यात काम करणाऱ्या शिक्षकांना सेवा बजावताना नैसर्गिक परिस्थितीचे मोठे दिव्य पार पाडावे लागते. अडचणींचा सामना करीत शिक्षण दान करणाऱ्या या शिक्षकांच्या कामाचे स्थानिक पातळीवर प्रोत्साहनपर कौतुक व्हायला हवे. याबाबत तालुका प्रशासन व शिक्षण विभागाने सकारात्मकता दाखवायला हवी. तालुक्‍यातील शिक्षक संघटनांनी आपले मतभेद बाजूला ठेवून या कार्यक्रमाला सहकार्य करावे, अशी शिक्षकांची भावना आहे. 

 शिक्षक दिनानिमित्त होणारा कार्यक्रम काही कारणांनी खंडित झाला असला तरी या वर्षी आम्ही तो घेणार आहे. अडचणींचा सामना करीत सेवा बजावणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करणार आहे.
- रूपाली राजपुरे, सभापती. 

शिक्षक दिनादिवशी हा कार्यक्रम या वर्षी जरूर होणार असून, खंडित झालेली परंपरा आम्ही यंदा सुरू करीत आहोत. त्यामुळे शिक्षकांच्या कामाचे नक्कीच कौतुक होणार आहे.
- आनंद पळसे, गटशिक्षणाधिकारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten years after the teacher award