नोटा नव्या पण लाचखोरीची प्रवृत्ती जुनीच 

नोटा नव्या पण लाचखोरीची प्रवृत्ती जुनीच 

कोल्हापूर - ""लाच खाणार; पण जुन्या नोटा नाही चालणार. नव्या कोऱ्या करकरीत नोटा असल्या तरच कामावर सही करणार,'' असा लाच खाणाऱ्यांचा पवित्रा असेल तर नव्या नोटा आणि जुनी प्रवृत्ती असेच चित्र पुढेही राहणार हे स्पष्ट झाले आहे. काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पाच दिवसांपूर्वी पाचशे, हजारच्या नोटा सरकारने रद्द केल्या; पण काल कोल्हापुरात नव्या नोटांच्या स्वरुपात 35 हजार रुपयांची लाच घेत नव्या नोटाही काळ्या पैशात रुपांतरित करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे चलनात नोटा नव्या आल्या काय किंवा जुन्याच ठेवल्या काय, यापेक्षा पैसे खाणाऱ्यांच्या प्रवृत्तीलाच चाप बसण्याची गरज आहे. कारण काळ्या पैशाविरोधात देशभर मोहीम चालू असताना नव्या करकरीत नोटांच्या स्वरुपात लाच मागण्याचे धाडस अजूनही अनेक जणांत कायम असल्याचे कालच्या घटनेवरून दिसत आहे. 

करकरीत नोटा लाच म्हणून स्वीकारण्याची घटना काल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात घडली. यातला चंद्रकांत सावर्डेकर हा क्‍लार्क म्हणजे हिमनगाचे केवळ एक टोक आहे. त्या क्‍लार्कला हे पैसे गोळा करायला कोण सांगत होते किंवा त्याने गोळा केलेले पैसे रोजच्या रोज गुपचुप घरी कोण नेत होते, हे महत्त्वाचे आहे. कारण काही पोलिस ठाण्यांत लाच घेताना हवालदारच सापडणार, मामलेदार कचेरीत पैसे घेताना तलाठीच सापडणार आणि इतर शासकीय कार्यालयांत पैसे घेताना क्‍लार्कच सापडणार, हा अलिखित नियमच आहे. कारण लाच स्वीकारण्याचे कामच त्यांच्यावर सोपवलेले आहे. त्यामुळे कारवाईत तेच सापडणार हे स्पष्ट आहे; पण हे ज्यांच्या सांगण्यावरून लाच स्वीकारतात ते नामानिराळे राहिले आहेत. काळ्या पैशाचा शोध घ्यायचाच असेल, तर अशा नामानिराळ्या प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांच्या मालमत्तेची तपासणी गरजेची आहे. कारण त्यांनी पगाराच्या उत्पन्नाच्या दहापट संपत्ती करून ठेवली आहे. महसूल, पोलिस, आर.टी.ओ. जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका, विक्रीकर, मुद्रांक शुल्क, दस्त नोंदणी कार्यालय, नगरभूमापन, वजनमापे, राज्य उत्पादन शुल्क, सार्वजनिक बांधकाम अशा सर्व विभागांत दुसऱ्याला पैसे गोळा करायला लावून आपण नामानिराळे राहणारे काही अधिकारी आहेत. खरोखरच काळ्या पैशाचा शोध घ्यायचा ठरवले, तर त्यांच्याकडे अचंबित करून टाकणारी संपत्ती सापडणार आहे. 

लाचलुचपत प्रतिबंध विभागाने जरूर कारवाईचा फास बऱ्यापैकी आवळत आणला आहे; पण कारवाईचा "अभ्यास' करत या लाचखोर वृत्तीच्या लोकांनी पळवाटा शोधल्या आहेत. आता पैशाची मागणी हे तोंडाने करत नाहीत. समोरचा कॅल्क्‍युलेटर उचलतात व त्यावर लाचेची रक्कम उमटवतात. लगेच डिलीट करून टाकतात. त्यामुळे लाच मागितल्याचे संभाषण टेप होत नाही आणि तो पुरावा कारवाईस उपयोगी ठरत नाही. 

माणसेही शोधण्याची गरज 

आता लाच स्वीकारताना दुसरा कोणी अनोळखी माणूस लाच देणाऱ्यासोबत असला तर ते पैसे स्वीकारत नाही, किंवा ठरलेल्या ठिकाणी लाच स्वीकारायला येत नाहीत. कारवाईत तर सापडायचे नाही; पण पैसे खाल्ल्याशिवाय काम करायचे नाही अशी ही प्रवृत्ती आहे. त्यामुळे काळा पैसा शोधून काढताना काळा पैसा खाणारी माणसेही शोधून काढण्याची गरज आहे. कोल्हापुरात काल दोन हजार रुपयांच्या नव्या कोऱ्या नोटा लाच म्हणून स्वीकारण्याच्या घटनेने ही गरज अधिक गडद झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com