महापालिकेच्या नवीन इमारतीसाठी लवकरच निविदा 

बलराज पवार 
Wednesday, 3 February 2021

मिरज रस्त्यावरील विजयननगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी होणाऱ्या महापालिकेच्या नवीन इमारतीच्या बांधकाम निविदेचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला आहे. इमारतीसाठी 33 कोटी 39 लाख रूपयांचा खर्च अपेक्षीत आहे.

सांगली : मिरज रस्त्यावरील विजयननगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी होणाऱ्या महापालिकेच्या नवीन इमारतीच्या बांधकाम निविदेचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर आला आहे. इमारतीसाठी 33 कोटी 39 लाख रूपयांचा खर्च अपेक्षीत आहे. त्यावर शुक्रवारी (ता. 5) स्थायी समितीत चर्चा होईल. त्याबरोबरच अनेक वर्षापासून रखडलेल्या खोकी हस्तांतरणाचा विषयही याच सभेत आणण्यात आला आहे. 

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा शुक्रवारी आहे. कोट्यवधींच्या विकास कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी आणले आहेत. महापालिका स्थापनेपासून पालिकेसाठी स्वतंत्र, प्रशस्त अशी नवीन इमारत बांधण्याची मागणी आहे. शासनाने विजयनगर येथे इमारतीसाठी अडीच एकर जागा दिली आहे. मात्र ही जागा कमी पडत असल्याने जादा जागा मिळावी यासाठी महापालिकेचे शासन दरबारी प्रयत्न सुरु होते. 

महापालिकेला वाढीव जागा देण्यास कृषी विभागाने नकार दिल्याने मिळालेल्या अडीच एकर जागेतच सुमारे एक लाख चौरस फुटांवर नवीन पाच मजली नवी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचे आराखडे तयार झाले आहेत. महासभेने त्याला मान्यता दिली आहे. आता निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी मान्यता देण्याचा विषय स्थायी समोर आणला आहे. तीन वर्षात इमारत पूर्ण करण्याचा मानस आहे. 

महापालिका क्षेत्रातील खोकी पुनर्वनसाचा विषयही बरीच वर्षे प्रलंबीत आहे. तोही मार्गी लागणार आहे. त्याचे प्रस्ताव सभेत आणण्यात आलेत. 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून नाला बांधकाम व अन्य कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी सभेसमोर आले आहेत.

 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tender for new municipal building soon