पंढरपुरात तणाव; एसटी गाड्यांवर दगडफेक

अभय जोशी
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

पंढरपूर: साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या कटआऊट वर दगडफेकीची घटना गुरुवारी (ता. 9) सायंकाळी येथे घडल्याने आज (शुक्रवार) सकाळी त्याचे पडसाद उमटले. दलित कार्यकर्त्यांनी आवाहन केल्यामुळे सकाळी शहराच्या काही भागातील व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली होती. त्यानंतर पोलिस व दलित कार्यकर्त्यांनी शहरात ध्वनीक्षेपकावरुन आवाहन दुकाने उघडण्याचे आवाहन केल्यावर सर्व व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली आणि जनजीवन सुरळीत झाले. परंतु त्याच दरम्यान दोन एसटी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली असून, त्यामध्ये एक एसटी चालक गंभीर जखमी झाला.

काल (गुरुवारी) येथील सांगोला रस्त्यावरील लहुजी वस्ताद चौकातील साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या कटआऊटवर अज्ञात समाजकटंकांनी दगडफेक केली. त्यामुळे दलित संघटनांचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. सांगोला रस्त्यावर एकत्र येऊन त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आणि संबंधित समाजकंटकांना अटक करुन त्यांच्या विरोधात ऍट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी तातडीने तिथे जाऊन संबंधित कार्यकर्त्यांना शोधून त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे आश्‍वासन देऊन कार्यकर्त्यांची समजूत घातली होती. त्यानंतर मध्यरात्री संतपेठेतील एक रिक्षा आणि मोटारसायकल अज्ञात लोकांनी जाळून टाकली.

दरम्यान, आण्णाभाऊ साठे यांच्या कटआऊट वर दगडफेक केल्याचे प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करुन एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कालच्या बंद नंतर व्यापाऱ्यांनी आज सकाळी दुकाने उघडलेली असताना काही दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शहरातून फिरुन व्यापाऱ्यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी घाबरुन दुकाने बंद केली. त्याच दरम्यान काही कार्यकर्त्यांनी दोन एसटी गाड्यांवर दगडफेक केली. त्यामध्ये एक एसटी चालक गंभीर जखमी झाला. पोलिसांनी दलित कार्यकर्त्यांची समजूत घातल्यावर दलित कार्यकर्त्यानी रिक्षेतून ध्वनीक्षेपकावरुन व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले. त्यानंतर व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने उघडली आणि पंढरपूर मधील जनजीवन सुरळीत झाले.

Web Title: Tension in Pandharpur Stacking of ST bus