दहावीच्या निरोप समारंभाला विकृत वळण

दहावीच्या निरोप समारंभाला विकृत वळण

कोल्हापूर - दहावीचा निरोप समारंभ म्हणजे कृतज्ञतेची भाषणे, शालेय जीवनातील आठवणींचा कल्लोळ, निरोपाचं भाषण करता करता येणारा हुंदका आणि समारंभ संपल्यावर पुढे आयुष्यभर नजरेसमोर राहणारा ग्रुप फोटो, ही रम्य ओळख आता काही घटकांनी पुसून टाकली आहे. यावर्षी अनपेक्षितपणे निरोप समारंभाला विकृत वळण दिले गेले असून डॉल्बी लावून धिंगाण्यासह मिरवणूक आणि मिरवणूक संपल्यावर एकमेकाला ‘निरोप’ असल्या विचित्र प्रकाराला विद्यार्थ्यांनी आपलेसे केले आहे.

काल सायंकाळी सातनंतर बावड्यात विद्यार्थ्यांच्या दोन गटांनी दोन स्वतंत्र मिरवणुका काढल्या. १६ वर्षांच्या आसपासची मुले या मिरवणुकीतील गटाची खुन्नस आपल्या हावभावातून व्यक्त करत नाचण्यात दंग होऊन गेली. 

वास्तविक निरोप समारंभाचा कार्यक्रम शाळेने आयोजित करायचा असतो; पण समारंभाचे नियोजन विद्यार्थ्यांनी आपल्या हातात घेतले असून सक्तीने वर्गणी काढून निरोप समारंभाचे आयोजन केले जात आहे. काही दिवसांपूर्वी सेंट झेवियर्स स्कूलजवळ जबरदस्तीने काही विद्यार्थ्यांना लुटण्याची घडलेली घटना या निरोप समारंभातूनच झाली आहे. 

या घटनेतील आरोपी अल्पवयीन आहेत, म्हणून वरवर तपास न करता पोलिसांनी खोलवर तपास केला तर या सक्तीच्या निरोप समारंभामागचे विकृत सत्य बाहेर येऊ शकणार आहे.

दहा वर्षे शालेय जीवनात एकत्र वाटचाल केल्यानंतर अकरावीला विद्यार्थ्यांच्या वाटा वेगवेगळ्या होतात. त्यामुळे दहावी परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी सदिच्छा व परीक्षेसाठी शुभेच्छा, अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्याची बहुतेक शाळात पद्धत आहे. या कार्यक्रमाला भावनिक पदरही आहे. कारण यानिमित्ताने विद्यार्थी बोलते होतात. शिक्षकांबद्दल, शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करता करता भावूक होऊन जातात. 

कडक म्हणून राग येणाऱ्या शिक्षकाचा कडकपणाच आयुष्यात पुढे शिस्त लागण्यात कसा उपयोगी पडेल, हे मनापासून बोलतात. 

शिक्षकही भावी वाटचालीबद्दल मार्गदर्शन करतात. शेवटी ग्रुप फोटोला सारे विद्यार्थी एकमेकाला खेटून उभे राहतात आणि आता पुढे एकमेकाची कधी गाठ पडेल, नाही या विचाराने गहिवरून एकमेकाला मिठ्या मारतात; पण आता परीक्षेच्या तयारीसोबत जल्लोषी निरोप समारंभाची तयारी सुरू आहे. प्रत्येकाने किमान ५०० रुपये वर्गणी द्यावीच, यासाठी सक्ती आहे. मूळ निरोप समारंभ नावालाच; पण नाच-गाणी, जल्लोष व धिंगाणा याला प्राधान्य आहे. 

सेंट झेवियर्स हायस्कूलसमोर घडलेले प्रकरण तर पोलिसांत गेले आहेच; पण त्याहीपेक्षा निरोप समारंभ त्याच दिशेने जाईल, असेच संकेत आहेत. काल बावड्यात निरोप समारंभाच्या दोन जल्लोषी मिरवणुका निघाल्या आणि पुढे का या समारंभात आणखी काय काय विचित्र असेल, याचेच संकेत देऊन गेल्या.

परस्पर नियोजन
विद्यार्थी शाळेतल्या अधिकृत निरोप समारंभाला प्राधान्य देत नाहीत. काही विद्यार्थी एकत्र येऊन परस्पर बाहेर असे निरोप समारंभ आयोजित करतात. त्याला विकृत स्वरूप देतात. कोणतीही शाळा असले विकृत समारंभ आयोजित करत नाही; पण परस्पर काही मोठ्यांची मुलेच पुढाकार घेऊन असले समारंभ आयोजित करत असतील तर शाळा काय करणार?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com