"या' मावशीच्या दहशतीने स्मार्ट सोलापूरकर त्रस्त

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

महापालिकेत उपचाराची सोय
श्‍वानदंशासह मांजर, शेळी, घोडा आणि माकडाने चावा घेतला तर त्यावर उपचार करण्याची सोय महापालिकेच्या दवाखान्यात उपलब्ध आहे. श्‍वानदंशाप्रमाणेच मांजर चावले तर रेबीजचे इंजेक्‍शन दिले जाते.
- डॉ. संतोष नवले, आरोग्याधिकारी
सोलापूर महापालिका

सोलापूर ः अनपेक्षितपणे होणाऱ्या श्‍वानदंशामुळे त्रस्त असलेल्या स्मार्ट सोलापूरकरांना आता "वाघाच्या मावशी'ने (मांजर) त्रस्त करण्यास सुरवात केली आहे. मांजर चावल्यामुळे उपचार घेणाऱ्यांची संख्या शहरात वाढली आहे. मांजर चावल्याने जखमी झालेल्या 142 जणांनी गेल्या सात महिन्यांत उपचार घेतल्याची नोंद आहे. श्‍वान दंशापाठोपाठ मांजर चावलेल्या रुग्णांची संख्या आहे.

सरासरी दरमहा 1800 जणांना श्‍वानदंश
सोलापूर शहरात गेल्या सात महिन्यांत सरासरी एक हजार 700 ते एक हजार 800 जणांना दरमहा श्‍वानदंश झाला आहे. सर्वाधिक दोन हजार 123 जणांना एप्रिलमध्ये श्‍वानदंश झाला आहे. तर जूनमध्ये सर्वाधिक 26 जणांना मांजरीने चावले आहे. त्याचे प्रमाण दरमहा 20 ते 25 असे आहे. महापालिकेच्या दवाखान्यात कुत्र्यांबरोबरच मांजर, माकड, गाढव, शेळी आणि घोडा चावला तर त्यावर उपचार करण्याची स्वतंत्र सोय आहे.

मोकाट कुत्र्यांची संख्या मोठी
महापालिका परिसरात सुमारे 41 हजार 900 मोकाट कुत्रे आहेत. रात्रपाळीत काम करणाऱ्यांना त्याचा मोठा त्रास होतो. आपण सुरक्षितपणे घरी पोचतो की नाही, याचीही त्यांना खात्री नसते. कोणत्या बोळातून अथवा गल्लीतून कुत्रा येईल आणि चावा घेईल, ही भीती कायम मनात असते. त्यातच दुचाकीस्वार हेल्मेट घातलेला असेल तर मोकाट कुत्रे आणखीन जोरात भुंकतातच, शिवाय अंगावरही येतात. कुत्र्यांची भीती कमी म्हणून की काय आता मांजरीपासून वाचण्यासाठी सोलापूरकरांना प्रयत्न करावे लागत आहेत.

म्हणून होते मांजर आक्रमक
अर्धवट जेवलेले अन्न अंगणात ठेवले की, मांजरीच्या फेऱ्या सुरू होतात. त्यातच मांसाहारी पदार्थ असतील तर मांजरीचे गुरगुरणे वाढते. हाकलून देण्याचा कुणी प्रयत्न केला तर त्याच्या अंगावर धावून जाते, प्रसंगी हाकलणाऱ्याला चावते. मग त्या रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. मांजर चावण्याचे प्रमाणही हळूहळू वाढू लागल्याने सोलापूरकरांना नव्याच दहशतीला सामोरे जावे लागत आहे. 

एप्रिल ते ऑक्‍टोबर 2019 पर्यंतचे बाधित रुग्ण
कुत्र्याचा चावा ः 12156
मांजरीचा चावा ः 142
माकडाचा चावा ः 08
गाढवाचा चावा ः 01
घोड्याचा चावा ः 01
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: terror of cat troubled Smart Solapur citizens