मोकाटांची दहशत 

मनोज जोशी
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

रात्रीच्या वेळी तर एकट्याने घराबाहेर पडताना अंगावर काटाच येतो. शिवाय, मोकाट जनावरे, डुकरांनीही धुमाकूळ घातला आहे. रस्त्यावरच ही जनावरे ठाण मांडतात.

कोपरगाव : शहरातील मुख्य रस्त्यासह गल्लोगल्ली मोकाट कुत्री, डुकरांनी धुमाकूळ घातला आहे. या मोकाट जनावरांना पकडण्याकरिता ठेकेदार नेमण्यासाठी पालिका प्रशासनाने तीन वेळा जाहिरात प्रसिद्ध केली; मात्र पालिकेच्या जाहिरातीस कोणीही सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.

अखेर पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनीच ही जबाबदारी खांद्यावर घेतली. 
सध्या तेच मोकाट कुत्री, डुकरे पकडत आहेत. मात्र, ठेका घेण्यासाठी कोणीच का उत्सुक नाही, याबाबत अधिकारी बोलायला तयार नाहीत. 

शहरातील कोणत्याही प्रभागात, कुठेही फेरफटका मारला, तरी कुत्र्यांचे टोळके दिसून येते. त्या परिसराचे अनभिषिक्त सम्राट असल्याच्या तोऱ्यात ते फिरत असतात. त्यांचे साम्राज्य पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकतो. 

रात्रीच्या वेळी तर एकट्याने घराबाहेर पडताना अंगावर काटाच येतो. शिवाय, मोकाट जनावरे, डुकरांनीही धुमाकूळ घातला आहे. रस्त्यावरच ही जनावरे ठाण मांडतात. मोकाट जनावरांचा वाहतुकीला नेहमीच अडथळा ठरत आहे. यामुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. 

मोकाट वळूमुळे स्वामी समर्थ भागातील एका शाळकरी मुलाचा, तर बेट भागातील एकाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. शहरातील काले मळा भागातही एका शाळकरी मुलावर पाच ते सहा कुत्र्यांनी हल्ला केला होता. त्यामुळे पालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालेले आहे. कुत्र्यांच्या भीतीने पालकांना आता मुलांना शाळेत ने-आण करावी लागत आहे. 

या पार्श्वभूमीवर शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. पालिका प्रशासन, आरोग्य विभागही वृत्तपत्रांतून जनावरे पकडण्याचा ठेका देण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करीत आहे. 

गेल्या वर्षी एका ठेकेदाराने पालिकेस सकारात्मक प्रतिसाद दिला. या वर्षी ठेकेदारच गायब झाला. त्यामुळे शहरात मोकाट जनावरांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. एखादी मोठी घटना घडण्याच्या आतच प्रशासनाने यावर त्वरीत उपायोजना करून बंदोबस्त करणे गरजेचे आहे. 

ठेकेदारही पालिकेला वैतागले 

या वर्षी पालिकेने तीन वेळा जाहिरात देऊनही, एकानेही त्यास प्रतिसाद दिला नाही. त्यातून अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. ठेकेदार ठेका घेण्यास का उत्सुक नाहीत, याची शहानिशा केली असता, पालिका मोकाट जनावरे पकडण्याचे काम करून घेते; मात्र बिले वेळेवर काढत नाही, अधिकारी कामे करूनही धारेवर धरतात, खिशातून भांडवल लावूनही बिले निघणार नसतील, तर हे कामच नको.

जनावरे मालकांची डोकेदुखी

जनावरे पकडल्यानंतर त्यांच्या मालकांची डोकेदुखी वेगळीच! त्यातून प्रसंगी हाणामारी, भांडणे होतात. ती मिटविण्यासाठी कोणीही पाठीशी उभे राहत नाही. त्यामुळे ठेकेदारांनी या वेळी पालिकेला ठेंगा दाखविल्याची माहिती मिळाली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The terror of dogs