शेणोली - ताकारी दरम्यान दुहेरी लोहमार्गाची बुधवारी चाचणी 

संतोष भिसे
सोमवार, 24 जून 2019

मिरज - पुणे - मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणातील शेणोली ते ताकारी टप्प्याची चाचणी बुधवारी होणार आहे. यानिमित्ताने पुणे-मिरज लोहमार्गाच्या इतिहासातील नव्या दालनाचा शुभारंभ होत आहे. प्रारंभी मोटर ट्रॉली पळवली जाईल; पाठोपाठ चाचणीची रेल्वे धावेल

मिरज - पुणे - मिरज लोहमार्गाच्या दुहेरीकरणातील शेणोली ते ताकारी टप्प्याची चाचणी बुधवारी होणार आहे. यानिमित्ताने पुणे-मिरज लोहमार्गाच्या इतिहासातील नव्या दालनाचा शुभारंभ होत आहे. प्रारंभी मोटर ट्रॉली पळवली जाईल; पाठोपाठ चाचणीची रेल्वे धावेल. दिल्लीतून सुरक्षा आयुक्त किंवा त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील. त्यांनी हिरवा कंदील दाखवल्यावर काही दिवसांतच दुहेरी रेल्वे वाहतुक सुरु होईल. 

रेल्वेच्या मुंबईस्थित मुख्य प्रशासकीय अधिकार्यांनी याबाबत सर्व विभागांना शुक्रवारी सूचना दिल्या. चाचणी कार्यक्रम असा - मुंबईतून शिवाजी महाराज टर्मिनसमधून मंगळवारी (ता. 25) रात्री अकरा वाजता चाचणी रेल्वे निघेल. बुधवारी सकाळी 9 ते सव्वानऊदरम्यान ताकारी स्थानकाची तपासणी होईल.

सव्वानऊ ते दिडदरम्यान ताकारी ते शेणोली लोहमार्गाची मोटर ट्रॉलीद्वारे तपासणी होईल. दोन वाजता शेणोली स्थानकाची तपासणी होईल. सव्वादोन ते पावणेतीनदरम्यान शेणोली ते ताकारीदरम्यान वेगवान रेल्वे सोडली जाईल. तिची गती सुरक्षा आयुक्त ठरवतील. त्यानंतर ताकारी ते कोल्हापूर मार्गाची तपासणी आयुक्त करतील. चाचणीसाठी रेल्वेच्या महत्वाच्या अधिकार्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 
डिसेंबर 2022 अखेर पुणे-मिरज या 279 किलोमीटर लोहमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे उद्दिष्ट आहे. 

सध्याची कामाची गती पाहता वर्षभर अगोरदच पुर्ण होण्याची चिन्हे आहेत. शेणोली ते ताकारी या 16 किलोमीटर अंतराची चाचणी यशस्वी झाली तर तात्काळ दुहेरी रेल्वे वाहतुक सुरु होईल. सुरुवातीला मालगाड्या नंतर प्रवासी गाड्या धावतील. पुढील टप्प्यात पुणे-फुरसुंगी दरम्यान चाचणीचे नियोजन आहे. 
देशभरात रुळांचा तुटवडा असतानाही पुणे-मिरज मार्गाला प्राधान्य दिले आहे. एक किलोमीटरसाठी 122 टन रुळ वापरले आहेत. दुहेरीकरण व विद्युतीकरणासाठी 1 हजार 700 कोटींची तरतुद आहे. 

पुणे-बंगळुरु मार्ग दुहेरी व वीजेवर चालेल. त्यातील मिरज - लोंढा काम गतीने सुरु आहे. विजेवरील पहिली गाडी कदाचित याच टप्प्यात धावेल. पुणे ते मिरज प्रवासाला सध्या पाच तास लागतात. काम झाल्यावर साडेतीन ते चार तासांत प्रवास शक्‍य आहे. सध्या एक्‍सप्रेसची कमाल गती 110 किलोमीटर आणि सरासरी गती 45 ते 60 किलोमीटर आहे. काम पुर्ण झाल्यावर सरासरी गती 90 किलोमीटरपर्यंत वाढेल. दक्षिण-पश्‍चिम विभागांतर्गत मिरज-लोंढा या 188 किलोमीटर विद्युतीकरण व दुहेरीकरण गतीने सुरु आहे. कृष्णा व घटप्रभा नदीवर पूल उभारण्यात आलेत. 

एक नजर
0 पुणे-मिरज-कोल्हापूर विद्युतीकरण - 326 किलोमीटरसाठी 513 कोटींची तरतुद 
0 विद्युतीकरणासाठी पॉवर ग्रीड कार्पोरेशनवर जबाबदारी 
0 मिरज, हातगणंगले, बेळगाव, कराड येथे वीज उपकेंद्रे 
0 कोल्हापूर, मिरज व पुणे येथे मोठ्या क्षमतेचे ट्रान्सफार्मर 
0 शेणोली-ताकारी 16 किलोमीटरमध्ये सर्वप्रथम दुहेरी वाहतूक 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Testing of Double Rail track between Shenoli - Takai