सोलापुरात वस्त्रोद्योगचे संग्रहालय उभारू - रावल 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जानेवारी 2017

सोलापूर - काळाच्या ओघाबरोबर उद्योगाचे आधुनिकीकरण न झाल्याने बांगला देश, व्हिएतनामच्या तुलनेत आपल्या देशातील वस्त्रोद्योग मागे राहिला. सोलापूर महापालिकेने राज्याच्या पर्यटन विभागाला सहकार्य केल्यास सोलापुरात वस्त्रोद्योगाचे संग्रहालय उभारू, अशी ग्वाही राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी गुरुवारी दिली. 

राज्य सरकारचे वस्त्रोद्योग मंत्रालय, श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ व मफतलाल फॅब्रिक्‍सच्या वतीने येथील बालाजी सरोवरमध्ये देशातील पहिल्या आंतरराष्ट्रीय गणवेश व वस्त्र प्रदर्शनाचे उद्‌घाटन रावल यांच्या हस्ते आज झाले. शनिवारपर्यंत (ता. 7) हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख, वस्त्रोद्योग विभागाचे मुख्य सचिव उज्ज्वल उके, वस्त्रोद्योगचे संचालक संजय मीना या प्रसंगी उपस्थित होते. 

रावल म्हणाले, की महात्मा गांधी यांच्या काळात चरख्यावर होणारा धागा ते वस्त्रोद्योगात झालेले बदल व आलेली यंत्रणा संग्रहालयात उभी केली जाईल. परदेशातून सोलापुरात आलेल्या नागरिकांना या संग्रहालयाच्या माध्यमातून वस्त्रोद्योगाचा इतिहास समजेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. 

सोलापूरला दत्तक घ्या - देशमुख 
सोलापुरात तयार होणारी वस्त्र उत्पादने विकत घेण्यासाठी मफतलाल उद्योग समूहाने सोलापूर दत्तक घ्यावे, आंतरराष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाचे प्रदर्शन परदेशात भरविण्यासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्राने आर्थिक मदत करावी, अशा दोन प्रमुख अपेक्षा वस्त्रोद्योगमंत्री देशमुख यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केल्या. या दोन्ही अपेक्षांना बॅंक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र मराठे, मफतलाल उद्योग समूहाचे ऋषिकेश मफतलाल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Web Title: Textile Museum Build in solapur - rawal