कापडाचे दर घसरले; यंत्रमाग लघुउद्योग दुहेरी कात्रीत

दिलीप कोळी | Monday, 23 November 2020

मागणीपेक्षा अतिरिक्त उत्पादनामुळे उत्पादीत कापडाचे दर कमी झाले आहेत. तर केंद्र शासनाच्या कापसाच्या हमीभावातील वाढीमुळे कापसाचे दर वाढल्याने सुताचे दर पण तेजीत आहेत.

विटा : मागणीपेक्षा अतिरिक्त उत्पादनामुळे उत्पादीत कापडाचे दर कमी झाले आहेत. तर केंद्र शासनाच्या कापसाच्या हमीभावातील वाढीमुळे कापसाचे दर वाढल्याने सुताचे दर पण तेजीत आहेत. या परस्परविरोधी परिस्थितीमुळे देशभरातील यंत्रमाग लघुउद्योग दुहेरी कात्रीत सापडला आहे. लॉकडाऊन शिथिल होत असला तरी देशभरातील वस्त्रोद्योग उत्पादनांची बाजारपेठ अद्यापही सुरळीत सुरु झाली नसल्याने वस्त्रोद्योग साखळी अद्याप ही विस्कळीतच असल्याने उद्योजक चिंतेत पडले आहेत. 

कोरोनाच्या जागतिक महामारीने गेल्या नऊ - दहा महिन्यपासून संपुर्ण जगभरातील उद्योग व्यापार व सामान्य जनजीवनही विस्कळीत झाले आहे. टप्प्याटप्प्याने 22 मार्चपासून संपुर्ण देशभर लॉक डाऊन लागु करण्यात आला. त्यामुळे वस्त्रोद्योग साखळीतील सुत व कापड उत्पादन जवळपास दोन ते तीन महिने पुर्णपणे बंद करण्यात आले होते. त्यानंतर जून नंतर हे उद्योग हळू हळू सुरु करण्यात आले. 

मात्र सुताचे व कापडाचे उत्पादन सुरु झाले तरी देशभरातील बाजारपेठा, मॉल्स व किरकोळ विक्रीची दुकाने बंद किंवा अंशत: सुरु झाली होती. तर दुसऱ्या बाजुला लोकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याने शिवाय मंगल कार्यालय बंद व विवाहास पन्नास लोकांची मर्यादा असल्याने लग्नाचा सिझन व पर्यायाने कापड विक्री प्रचंड प्रभावीत झाली होती व अद्यापही तशीच स्थिती आहे. त्यामुळे बाजारात कापड किंवा कपड्यांना अद्यापही पुर्वीप्रमाणे गिऱ्हाईक नाही. त्यामुळे उत्पादीत कापड गि-हाईकांअभावी पडून रहात असल्याचे चित्र आहे. दुसऱ्या बाजूला कापड निर्यातदेखील प्रचंड प्रभावीत झाल्याने देशांतर्गत कापडांचा साठा वाढू लागल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

Advertising
Advertising

केंद्र व राज्य शासनानेही वस्त्रोद्योग साखळीतील मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याने अडचणीत वाढच झाली आहे. त्यातच पुन्हा आणखी काही देशात व आपल्या देशातील काही राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव वाढू लागला असून पुन्हा विमान बंदी, रेल्वे बंदी, लॉडाऊन, कर्फ्यु सारख्या बातम्यांमुळे वस्त्रोद्योगात पुन्हा भीतीचे व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

शेतीखालोखाल रोजगार निर्मितीची क्षमता असलेला आणि केंद्र व राज्य शासनाला कराच्या रूपात प्रचंड महसुल तसेच निर्यातीच्या माध्यमातून परदेशी चलन मिळवून देणा-या या विकेंद्रित यंत्रमाग व्यवसायाला केंद्र व राज्य शासनाने मदतीचा हात देणे आवश्‍यक आहे. 
- किरण तारळेकर, अध्यक्ष, विटा यंत्रमाग संघ. 

आकडे बोलतात....
देशात 20 लाख यंत्रमाग 
महाराष्ट्र - 11 लाख यंत्रमाग 
थेट कामगार 5 लाख 
इनडायरेक्‍ट कामगार 5 लाख 

जिल्ह्यात दहा हजार यंत्रमाग 
सांगली जिल्ह्यात दहा हजार विकेंद्रित यंत्रमाग आहेत. त्यावर पाच हजार कामगारांची उपजिविका सुरू आहे. कोरोनाचा या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. यंत्रमागावर उत्पादित होणाऱ्या कापडाचे सध्या दर कोसळले आहेत. कापडाची निर्यात थांबली आहे. उत्पादन जास्त झाल्याने व्यवसायात स्पर्धा सुरू झाली आहे. या सर्व कारणामुळे सध्या उद्योग व त्यावर अवलंबून असलेले कामगार व उद्योजक अडचणीत सापडले आहेत.

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 

सांगली