सोलापूरच्या शेतकऱ्यांना थायलंडच्या पेरुचा आधार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

⚫ सांगोला, पंढरपूर, माढा तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा लागवडीकडे अधिक कल 
⚫ दोन वर्षामध्ये जिल्ह्यात सुमारे एक हजार 600 हेक्‍टर क्षेत्रवर लागवड 
⚫ कमी कालवधीमध्ये मिळतेय भरघोस उत्पन्न 
⚫ शेतकऱ्यांसाठी राज्य पेरू उत्पादक महासंघाची स्थापन

⚫पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांना थायलंडचा (व्हीएनआर) पेरू खुणावू लागला आहे. हलक्‍या मुरमाड जमिनीत आणि कमी पाण्यात पेरुचे हमखास आणि चांगले उत्पादन मिळत असल्याने जिल्ह्यातील इतर भागातील शेतकरीही आता पेरु लागवडीकडे वळू लागले आहेत. गेल्या दोन वर्षामध्ये सोलापूर जिल्ह्यात सुमारे एक हजार 600 हेक्‍टर क्षेत्र पेरु लागवडीखाली आले आहे. कमी कालवधीमध्ये भरघोस उत्पन्न मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांना थायलंडच्या पेरुचा आर्थिक आधार मिळाला आहे. वर्षभरात शेतकऱ्यांना पेरु उत्पादनातून सुमारे 2 कोटी 80 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 

हेही वाचा : राजकीय संघर्षावर सोलापुरातील तरुणाई काय म्हणतेय पहा (विडिओ)

जिल्ह्यातील कोरडवाहू शेतीमध्ये डाळिंब, बोर या फळ पिकांची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली होते. परंतु सततच्या हवामान बदलामुळे डाळिंब आणि बोर या पिकांवर तेल्या, मर रोगाचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला आहे. किड आणि रोगांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डाळिंब शेती धोक्‍यात आली आहे. त्यामुळे आता कोरडवाहू शेतीसाठी पर्यायी पिक म्हणून पेरुची लागवड वाढली आहे. ही लागवड सांगोला, माढा, पंढरपूर, माळशिरस, बार्शी या भागात अधिक प्रमाणात झाली आहे.

हेही वाचा : जिद्दीने बनली हि रणरागिणी उद्योजिका 

2012 मध्ये जैनवाडी (ता. पंढरपूर) येथील प्रयोगशील शेतकरी किरण दानोळे यांनी पहिल्यांदा छत्तीसगड येथील विदेशी व्हीएनआर (थायलंड) जातीच्या पेरुची लागवड केली होती. त्यानंतर हळूहळू या भागातील शेतकऱ्यांचा या जातीच्या पेरु लागवडीकडे कल वाढला आहे. अकोल (ता. सांगोला) येथील शेतकरी पांडुरंग आसबे यांनीही आपल्या तीन एकर शेतीमध्ये थायलंड जातीच्या पेरुची लागवड केली आहे. लागवडीपासून त्यांना 11 महिन्यात पेरुचे उत्पादन सुरु झाले आहे. यावर्षी त्यांना तीन एकरातून जवळपास 11 ते 12 टन उत्पादन मिळाले आहे. त्यांच्या पेरुला उच्चांकी 110 रुपये किलोचा दर मिळाला आहे. तीन लाख रुपयांचा खर्च वजा जाता त्यांना यावर्षी सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 
जैनवाडी (ता. पंढरपूर) येथील किरण दानोळे यांनीही थायलंड पेरु पासून चांगले उत्पन्न मिळवले आहे. दानोळे यांनी गेल्या सहा ते सात वर्षात सुमारे 23 हजार पेरु रोपांची निर्मिती करुन ती शेतकऱ्यांना लागवडीसाठी दिली आहेत. 

हेही वाचा : बाबासाहेबांच्या येथील परिषेदेकडे होते जगाचे लक्ष

कोरडवाहू शेतीसाठी पेरु पिक हमखास उत्पादन मिळवून देणारे पिक असल्याने शेतकऱ्यांमध्ये जानजागृती करण्यासाठी प्रसारासाठी उपळाई (ता. माढा) येथील पेरु उत्पादक शेतकरी बाळासाहेब पाटील यांनी राज्य पेरू उत्पादक महासंघाची स्थापन केली आहे. महासंघाच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत. 

तीन एकरातून 12 टन उत्पादन 
दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी पेरुचे पीक वरदान ठरले आहे. हलकी जमिन आणि कमी पाणी असतानाही पेरुचे पीक चांगले येते. उष्ण हवामानात थायलंड पेरुचे चांगले उत्पादन मिळते. यावर्षी तीन एकरातून 12 टन पेरुचे उत्पादन मिळाले आहे. खर्च वजा जाता आठ लाख रुपये मिळाले. 
- पांडुरंग आसबे, पेरु उत्पादक शेतकरी, अकोला, ता. सांगोला 

यंदा 60 हजार टन मालाची विक्री 
डाळिंबाला पर्यायी पिक म्हणून पेरुची लागवड वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यात आज मितीस सुमारे 1 हजार 600 हेक्‍टर क्षेत्रावर पेरुची लागवड केली आहे. विशेषतः सांगोला, माढा, बार्शी, पंढरपूर या कमी पाण्याच्या भागात पेरुची लागवड वाढली आहे. यावर्षी जिल्ह्यातून सुमारे 60 हजार टन पेरुची विक्री करण्यात आली आहे. सरासरी 70 हजार रुपये दराने 2 कोटी 80 लाख रुपयांचे उत्पन्न शेतकऱ्यांना मिळाले आहे. 
- बाळासाहेब पाटील, अध्यक्ष, पेरु उत्पादक महासंघ, महाराष्ट्र


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thailands guava Support to Solapur Farmers