थॅलेसिमिया रुग्णांना रक्त मिळण्यात अडचणी

प्रवीण जाधव
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

सातारा - जिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा व खासगी रक्तपेढ्यांतून रक्त मिळण्यात येणाऱ्या अडचणी जिल्ह्यातील थॅलेसिमीयाच्या रुग्णांच्या जिवावर बेतत आहेत. समवेदना मेडिकल फाउंडेशनच्या समन्वयाने त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होत असले, तरी रुग्णालय तसेच जिल्हा प्रशासनाकडून यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. 

सातारा - जिल्हा रुग्णालयातील अपुऱ्या सुविधा व खासगी रक्तपेढ्यांतून रक्त मिळण्यात येणाऱ्या अडचणी जिल्ह्यातील थॅलेसिमीयाच्या रुग्णांच्या जिवावर बेतत आहेत. समवेदना मेडिकल फाउंडेशनच्या समन्वयाने त्यावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होत असले, तरी रुग्णालय तसेच जिल्हा प्रशासनाकडून यावर तातडीने तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. 

काय आहे थॅलेसिमीया?
हा अनुवांशिक रक्त-आजार आहे. आई-वडील दोन्ही अल्पवयीन किंवा दोन्हीपैकी एक अल्पवयीन असल्यास त्यांना होणारी मुलंही थॅलेसिमीयाचे रुग्ण असण्याची शक्‍यता २५ ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत असते. आज देशात सुमारे दहा ते १५ हजार अशी मुले आहेत. जिल्ह्यामध्ये सुमारे दीडशे अशी मुलं आहेत. या मुलांचे आयुष्यमान कमी असते. १७ ते १८ वर्षांपर्यंतच यातील बहुतांश जगतात. शारीरिक वाढही सामान्य बालकांपेक्षा खूपच कमी असते. अगदी २० वर्षांच्या मुलाची उंचीही सात-आठ वर्षांच्या मुलाएवढी झालेली असते.

रक्ताची अत्यंत आवश्‍यकता
या मुलांमध्ये रक्ताचे प्रमाण अत्यंत कमी असते, तसेच ते तयार होण्याची प्रक्रियाही संथ असते. त्यामुळे या रुग्णांना वारंवार रक्त चढवावे लागते. काहींना एक तर, काहींना तीन-तीन पिशव्या रक्त दर महिन्याला द्यावे लागते. रक्तातील लाल पेशी त्यासाठी या रुग्णांना दिल्या जातात. जिल्हा रुग्णालयामध्ये रक्तघटक विघटनाची प्रक्रिया होत नाही. त्यामुळे या रुग्णांना खासगी रक्तपेढ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. वारंवार रक्त द्यावे लागत असल्याने अनेकदा रक्त पेढींकडून अशा रुग्णांना रक्त उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. वेळेत रक्त उपलब्ध न झाल्याने या रुग्णांच्या जिवावर बेतणारे ठरते.

डे केअर सेंटर नाही
जिल्हा रुग्णालयामध्ये या रुग्णांना औषधे उपलब्ध होत आहेत. मात्र, रक्तघटक विघटनाची प्रक्रिया उपलब्ध नसल्याने रुग्णांना बाहेरून रक्त आणावे लागते. मात्र, हे रक्त देण्यासाठी स्वतंत्र वॉर्डची सोय नाही. सध्या उपलब्ध असलेल्या वॉर्डमध्येच रक्त दिले जाते. काही वेळा एकाच बेडवर दोन-दोन रुग्णांना रक्त देण्याचे काम केले जाते. या रुग्णांची प्रतिकार क्षमता अत्यंत कमी असते. त्यामुळे सध्या वॉर्डमध्ये असलेल्या विविध प्रकारच्या रुग्णांच्या आजाराचा या रुग्णांना संसर्ग होण्याची शक्‍यता निर्माण होत आहे. त्यामुळे अशा रुग्णांना स्वतंत्र डे केअर सेंटर उभारणे आवश्‍यक आहे. 

सोनोग्राफी केली जात नाही
सतत बाहेरून रक्त दिल्याने या रुग्णांच्या शरीरातील आयर्नचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढते. त्यामुळे त्यांची पाणथरी काढण्याची शस्त्रक्रिया करावी लागते. त्यासाठी ठराविक कालावधीनंतर सुमारे तीन महिन्यांनी या रुग्णांची सोनोग्राफी करणे गरजेचे असते; परंतु जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफीची सुविधा असूनही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणीचा सल्ला दिला जात नाही. तसेच या रुग्णांना अन्य रुग्णांबरोबर रांगेत ताटकळावे लागते. यावरही उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर एकाच कुटुंबात अशा प्रकारची दोन-तीन मुले आढळून आली आहेत. त्यासाठी स्त्रीरोग विभागाकडून योग्य ते मार्गदर्शन होणे आवश्‍यक आहे.

थॅलेसिमियाचे बहुतांश रुग्ण गरीब कुटुंबातील आहेत. त्यांच्यावर उपचार व तपासणीपोटी साधारण २० ते ३५ हजार रुपयांचा खर्च येतो. गरीब कुटुंबांना तो परवडत नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालय व जिल्हाधिकाऱ्यांनी या रुग्णांना योग्य तो सल्ला, औषधे, तपासण्या उपलब्ध होण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले पाहिजेत. रक्तघटक व डे केअर सेंटरचा प्रश्‍न तातडीने मार्गी लागणे 
गरजेचे आहे. खासगी रक्‍तपेढ्यांना रुग्ण वाटून देऊन रक्त मिळण्यातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
- बरकत पन्हाळकर, अध्यक्ष, समवेदना मेडिकल फाउंडेशन  

Web Title: Thalassemia Patient Blood Problem