सुपा एमआयडीसीत थर्माकोलचा तलाव 

मार्तंड बुचुडे 
गुरुवार, 5 डिसेंबर 2019

सुपे औद्योगिक वसाहतीत वाघुंडे शिवारात असलेल्या तलावाचे काम नुकतेच जलयुक्त शिवार योजनेतून सुमारे 10 लाख रुपये खर्चून करण्यात आले होते. या परिसरात वाघुंडे गावची शेती व मोठ्या प्रमाणात लोकवस्तीही आहे. येथील तलावाचे पाणी जनावरांसाठी पिण्यास उपयोगी पडते. मात्र, येथील एका कंपनीने आपला प्लॅस्टिक व थर्माकोलचा कचरा तलावात आणून टाकला आहे.

पारनेर ः सुपे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीने आपल्या कारखान्यातील प्लॅस्टिक व थर्माकोलचा कचरा थेट तलावात टाकला आहे. तेथेच असलेल्या दुसऱ्या कंपनीतील दूषित पाणीही या तलावात सोडले आहे. इतकेच नव्हे, तर या परिसरातील शेतीतील विहिरी व कूपनलिकांचेही पाणी दूषित झाल्याने पिकांसह नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

तलावात थर्माकोल टाकले 
सुपे औद्योगिक वसाहतीत वाघुंडे शिवारात असलेल्या तलावाचे काम नुकतेच जलयुक्त शिवार योजनेतून सुमारे 10 लाख रुपये खर्चून करण्यात आले होते. या परिसरात वाघुंडे गावची शेती व मोठ्या प्रमाणात लोकवस्तीही आहे. येथील तलावाचे पाणी जनावरांसाठी पिण्यास उपयोगी पडते. मात्र, येथील एका कंपनीने आपला प्लॅस्टिक व थर्माकोलचा कचरा तलावात आणून टाकला आहे. त्याचा मोठा थर पाण्यावर तरंगत आहे. 

supe

वाघुंडे ः सुपे औद्योगिक वसाहतीमधील कंपनीने कचरा टाकल्याने तलावाच्या पाण्यावर तरंगलेला त्याचा थर. 

हेही वाचा तो नाही म्हणाला अन्‌ मृत्यूजवळ गेला 

सांडपाणी तलावात सोडले 
याच बरोबर या तलावाच्या परिसरात असलेल्या दुसऱ्या एका कंपनीने आपले दूषित पाणीही याच तलावात सोडल्याने हे दूषित पाणी व कचरा यामुळे तलावातील पाणी हिरवे झाले आहे. हे पाणी दूषित झाल्याने या परिसरातील शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणीही दूषित झाले आहे. 

कूपनलिकांचे पाणी दूषित 
तलावातील पाणी पिण्यायोग्य न राहिल्याने या परिसरातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तसेच हे पाणी जमिनीत मुरल्याने या परिसरातील विहिरी व कूपनलिका यांचेही पाणी दूषित झाले आहे. त्यामुळे या परिसरातील रहिवाशांचे आरोग्यही धोक्‍यात आले आहे. अनेक जनावरे या तलावातील पाणी पितात. त्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या जनावरांना अनेक आजारांनी घेरले आहे. 
दरम्यान, याप्रकरणी नगर येथील प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. 

supe 2

तक्रारी करून थकलो 
औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांकडे सुमारे 80 लाखांहून अधिक रुपयांची थकबाकी आहे. मात्र, ती वसूल होत नाही. कंपन्यांमध्ये धड नोकरीही मिळत नाही. मात्र, आम्हा ग्रामस्थांना प्रदूषणाचा मोठा त्रास होत आहे. यावर कोणीच काही उपाययोजना करत नाही. आम्ही तक्रारी करून थकलो आहोत. न्याय कोणाकडे मागावा? 
- संदीप मगर, सरपंच, वाघुंडे 

हेही वाचा नामी शक्कल! वाळूची आलिशान वाहतूक! 

पर्यावरणाशी आमचा संबंध नाही 
जमीन अधिग्रहण करणे त्यांचे प्लॉट पाडून मागणीप्रमाणे त्याचे वाटप करणे, आमचे काम आहे. आमचा परिसरातील पर्यावरणाशी संबंध येत नाही. त्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. 
- हेमांगी पाटील, विभागीय अधिकारी, एमआयडीसी 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tharmocol Lake in Supa MIDC