Belgaum : औद्योगिक वसाहतीत कुशल कामगारांची वानवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

industry

औद्योगिक वसाहतीत कुशल कामगारांची वानवा

बेळगाव : बेळगाव शहर व आसपास असलेल्या औद्योगिक वसाहतीला कुशल कामगारांची समस्या भेडसावत आहे. उद्योजकांना अकुशल कामगारवर्गावर अवलंबून राहण्याची वेळ आली आहे. यामुळे उत्पादनाच्या दर्जावर परिणाम होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

बेळगावात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत. येथील कारखान्यात अनेक प्रकारचा माल तयार होतो. कामगारांसाठी या ठिकाणी कामगार खात्याकडून मार्गदर्शन शिबिरे, कार्यशाळा होणे आवश्‍यक आहे. यापूर्वी जुन्या पद्धतीने कामे केली जात होती. मात्र, आता अत्याधुनिकपणा आला आहे. मशिनच्या सहाय्याने कामे करावी लागत आहे. मात्र, या मशिनी चालविण्यासाठी कुशल कामगारांची वाणवा जाणवत आहे. यासाठी उद्योजकांनीच पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे. सरकारच्या कौशल्य विकास उपक्रमांतर्गत कामगारांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे.

सध्या बेळगाव शहर व परिसरात परप्रांतीय कामगार आहेत. त्या कामगारांचे शिक्षणही कमीच असते. यामुळे कुशल कामगारांची गरज उद्योजकांना भासू लागली आहे. बेळगावातील औद्योगिक वसाहतीत तयार झालेल्या मालाला विविध राज्यासह परदेशातून मोठी मागणी आहे.

कुशल कामगार राहिल्यास मालाचे उत्पादन तातडीने तयार करुन दिले जाऊ शकते. केंद्र सरकारने औद्योगिक व व्यावसयिक क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम योजना राबविली आहे. यात टर्नर, फिटर, वेल्डर, मशिनिस्ट, सीएनसी ऑपरेटर याचे शिक्षण दिले जात आहे. बेळगावातही त्याचे केंद्र आहेत. मात्र, याबद्दल अधिक जागृती नसल्यामुळे कामगारांकडून प्रशिक्षण घेतले जात नाही.

उत्पादन प्रक्रियेला मिळेल गती

औद्योगिक वसाहतीत आसपासच्या गावातील तसेच महाराष्ट्रातील कामगारही येतात. मात्र, यातील अनेक कामगार हे दहावी, बारावी झालेले आहेत. यांना या ठिकाणी येऊनच मशिनींचे शिक्षण घ्यावे लागते. आयटीआय, डिप्लोमा किंवा अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले कर्मचारी खूपच कमी आहेत. याचा फटका उत्पादन प्रक्रियेला बसत आहे. कुशल कामगार राहिल्यास उत्पादन उच्च दर्जाचे होण्यास मदत होणार आहे.

loading image
go to top