esakal | the sheep price in belgaum rupees 1 lakh 80 thousand market

बोलून बातमी शोधा

null

बकऱ्याची किंमत चक्क लाखांच्या घरात; बुदलमुखच्या बकऱ्याची बागलकोटला विक्री

sakal_logo
By
स्नेहल कदम

निपाणी (बेळगाव) : बुदलमुख (ता. निपाणी) येथील पांडुरंग बाबू येजरे यांच्या ‘शंभुराजे’ या टक्करीच्या बकऱ्याला तब्बल एक लाख ८० हजार रुपयाची किमत मिळाली आहे. बागलकोट जिल्ह्यातील सिमेकल येथील बकऱ्यांच्या टकरीचे शौकीन जवान जगदीश अनवल यांनी त्याची खरेदी केली आहे. येजरे यांनी तीन वर्षापूर्वी कुर्ली येथील शामा धनगर यांच्या मेंढरांच्या कळपातून ‘शंभूराजे’ या बकऱ्याची सहा हजार रुपयाला खरेदी केली. निगा राखण्यासाठी सकाळ, सायंकाळ चार अंडी, तीन लिटर दूध, तांबडी कुळीथ, रवा शिजवून दिला. शिवाय औषधे व टॉनिक दिले. दररोज या बकऱ्यावर ३०० रूपये केले. त्यामुळे वजन तब्बल १५० किलो झाले.

पांडुरंग येजरे हे टक्करी शौकीन आहेत. त्यांनी आतापर्यंत शंभूराजेला घेऊन हुबळी, मुधोळ, महालिंगपूर, गोकाक, बागलकोट, कोल्हापूर, आजरा, मुरगूड, चंदगड, नागरमुनोळी, सारापूर, बुदलमुख परिसरातील यात्रा-जत्रांमध्ये टक्करीत सहभाग घेतला. आजतागायत ३१ विजेतेपद शंभुराजेने पटकावली आहेत. यामुळेच जगदीश अनवल यांनी त्याची खरेदी केली. खरेदीवेळी जाफर बागवान, पैलवान विष्णू कडाकणे, मुबारक सौदागर, अशोक ढवळेश्वर, काकासाहेब कुंभार, मुकेश कदम, कुमार अनवल, आसिफ शेख, धीरज कापसे, अब्बास नदाफ आदी उपस्थित होते.

"आपण बकऱ्यांच्या टक्करीचे शौकीन असल्याने १० बकरी बाळगली आहेत. आता ‘शंभूराजे’ची खरेदी केली आहे."

- जगदीश अनवल, सीमेकल, जि. बागलकोट

"‘शंभूराजे’ या बकऱ्याने सर्वच ठिकाणी प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याची माहिती मिळाल्यानंतर श्री. अनवल यांनी खरेदी केली आहे."

- पांडुरंग येजरे, बुदलमुख