
मांगले(जि. सांगली)- येथील डॉ.बी. एन. पाटील यांचा गंधा नर्सिंग होम हा घरवजा दवाखाना फोडून लॉकरमधील 29 तोळे सोने, दहा भार चांदी व रोख 50 हजार रूपये असा साडे सात लाखाच्या ऐवजावर डल्ला मारणा-या गावातीलच सराईत चोरट्यास शिराळा पोलिसांनी अटक केली. राहुल उत्तम देवकर (वय 24, रा.मांगले, ता. शिराळा) असे त्याचे नाव आहे.
मांगले(जि. सांगली)- येथील डॉ.बी. एन. पाटील यांचा गंधा नर्सिंग होम हा घरवजा दवाखाना फोडून लॉकरमधील 29 तोळे सोने, दहा भार चांदी व रोख 50 हजार रूपये असा साडे सात लाखाच्या ऐवजावर डल्ला मारणा-या गावातीलच सराईत चोरट्यास शिराळा पोलिसांनी अटक केली. राहुल उत्तम देवकर (वय 24, रा.मांगले, ता. शिराळा) असे त्याचे नाव आहे. देवकर हा सराईत चोरटा असून त्याच्यावर कोडोली, हातकणंगले पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. तब्येत बरी नसल्यामुळे मंगळवारी रात्री डॉ. पाटील यांच्या दवाखान्यात गेला होता, मात्र दवाखान्याला कुलूप असल्याची संधी साधत त्याने दागिने व रोकड यावर डल्ला मारल्याचे तपासात पुढे आले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मांगले येथे डॉ. पाटील यांचे गंधा नर्सिंग होम आहे. ते 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 वाजता कुटुंबासह कराड येथे वास्तुशांतीच्या कार्यक्रमास गेले होते. त्यानंतर राहुल देवकर हा सराईत चोरटा मंगळवारी उपचारासाठी दवाखान्यात गेला. तेव्हा दवाखाना बंद असल्याचे पाहून त्याला चोरीची संधी मिळाली. त्याने मागील बाजूला जाऊन पाहणी करून घरवजा दवाखाना फोडला. घरातील सोन्याचांदीचे दागिने, देवाची भांडी व रोख 50 हजार रूपये घेऊन अंधारात त्याने पलायन केले. चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर डॉ. पाटील यांनी शिराळा पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली.
चोरीनंतर पोलिस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी घटनास्थळी भेट दिली. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी सूचना केल्या. या गुन्ह्याचा तपास करत असताना शिराळा येथील लक्ष्मी चौकातील सिद्धनाथ ज्वेलर्स दुकानात अज्ञात चोरटा सोन्याच्या बांगड्या विकण्यासाठी येणार असल्याची माहिती खब-या कडून मिळाली. त्यानुसार सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील व गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने सापळा रचला. काही वेळातच देवकर तिथे आल्यानंतर त्याला पकडले. झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे सोन्याच्या बांगड्या मिळाल्या. कसून चौकशी केल्यानंतर त्याने डॉ. पाटील यांच्या दवाखान्यात चोरी केल्याची कबुली दिली. दुपारी त्याला घटनास्थळी आणण्यात आले. त्याने चोरी कशी केली याचे प्रात्यक्षिक दाखवले. दरम्यान त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याच्या देवकर गल्लीतील घराची झडती घेतली. घराच्या माळ्यावर मुद्देमाल ठेवला असल्याचे सांगितले. तो पंचनामा करून जप्त केला.
उपाधीक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक विशाल पाटील, विनोद जाधव, चंद्रकांत कांबळे, कालिदास गावडे, अरुण कानडे, नितीन यादव, अभिजित पवार, युवराज जगदाळे, स्नेहल कुंभार, अमृत कुंभार, रणजीत टोमके यांच्या पथकाने ही चोरी उघडकीस आणली.