तुजारपूर दरोड्यातील चौघे जेरबंद; ऐवज जप्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

एक नजर 

  • तुजारपूर (ता. वाळवा) येथील यादव मळ्यातील घरात चोरट्यांनी सशस्त्र टाकलेल्या दरोड्याप्रकरणी चार संशयितांना जेरबंद
  • एक अल्पवयीन मुलगाही ताब्यात
  • त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत
  • बंजार बिरज्या पवार (वय २२, साखराळे, ता. वाळवा), आतेश ऊर्फ कोथळा येडग्या काळे (२१, गाताडवाडी, वाळवा), विशाल ऊर्फ गुंग्या शेखर काळे (२२, रेठरेधरण, वाळवा) व तुषार ऊर्फ चिमण्या इन्कलाब काळे (१९, विजयनगर रोड, कुपवाड) अशी संशयितांची नावे. 

सांगली - तुजारपूर (ता. वाळवा) येथील यादव मळ्यातील घरात चोरट्यांनी सशस्त्र टाकलेल्या दरोड्याप्रकरणी एलसीबीने चौघा संशयितांना जेरबंद  केले. त्यांच्यासह एक अल्पवयीन मुलासही ताब्यात  घेतले आहे. त्यांच्याकडून अडीच लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. बंजार बिरज्या पवार (वय २२, साखराळे, ता. वाळवा), आतेश ऊर्फ कोथळा येडग्या काळे (२१, गाताडवाडी, वाळवा), विशाल ऊर्फ गुंग्या शेखर काळे (२२, रेठरेधरण, वाळवा) व तुषार ऊर्फ चिमण्या इन्कलाब काळे (१९, विजयनगर रोड, कुपवाड) अशी त्यांची नावे आहेत. 

अधिक माहिती अशी, की फिर्यादी भास्कर तातोबा यादव यांच्या मळ्यात ३१ मार्चला दरोडा पडला होता. भास्कर यांची मुले कामानिमित्त बाहेरगावी होती. घरी ज्येष्ठ, महिला व मुले होती. रात्री बाराच्या सुमारास घरी सारे  जागे असतानाच दरोडेखोर आले. त्यांच्या हाती चाकू, लोखंडी गज होते. काहींना दरवाजाबाहेर उभे राहूनच भास्कर यांना गप्प खाली बसवले. गजाने छातीवर हल्ला केला. त्यांचा आवाज ऐकून पत्नी व नाती बाहेर आल्या.

चाकूचा धाक दाखवत पत्नीच्या हातातील अंगठी, मंगळसूत्र, चांदीच्या पट्टया, कानातील रिंगा काढून घेतल्या. दोघांनी बॅगा, कपाटात शोधाशोध केली. दोघांनी लोखंडी कपाट कटावणीने उचकटले. त्यातील लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने काढून घेतले. चोरट्यांनी पावणे चार लाखांचा मुद्देमाल घेऊन घराला बाहेरून कडी लावून पळ काढला.

पोलिसांनी गेल्या चार दिवसांत गतीने तपास करीत चोरट्यांचा माग काढला. चोरट्यांमध्ये एक अल्पवयीन मुलगा आहे. अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

दरोडेखोर सराईत 
अटकेतील आतेश काळे हा पोलिस नोंदीवरील गुन्हेगार असून तो फरारी होता. टोळक्‍याने गुन्ह्यात वापरलेली दुचाकी कऱ्हाड येथून चोरली असल्याचे स्पष्ट झाले आहे. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Theft case in Tujarpur four arrested