घराचे कर्ज फेडण्यासाठी त्याने 16 महिलांचे दागिने लांबवले

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 जानेवारी 2017

सांगली - विश्रामबाग परिसरात तब्बल 16 महिलांचे सोन्याचे दागिने "धूम स्टाइल' ने लंपास करणाऱ्या अभिजित ऊर्फ राजू अरुण सातपुते (वय 28, मंगळवार पेठ, चर्चजवळ, मिरज) याला "एलसीबी' च्या पथकाने अटक केली. 16 पैकी 9 गुन्ह्यांतील 13 तोळे दागिने, तीन दुचाकी असा 4 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. इतर 7 गुन्हे मात्र पोलिस ठाण्यात दाखल नाहीत. घराचे कर्ज फेडण्यासाठी त्याने या सर्व चोऱ्या केल्याची कबुली दिली आहे.

अधिक माहिती अशी, दुचाकीवरून "धूम स्टाइल' ने येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. या गुन्ह्यांची पद्धत पाहिली तर प्रत्येक चोरीमध्ये दोघांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. मात्र सातपुते याने एकट्याने धाडसाने चोऱ्या करण्याचा सपाटा लावला होता. सातपुते याने विश्रामबाग पोलिस ठाणे हद्दीतच दीड ते दोन वर्षात जवळपास 16 महिलांचे दागिने लांबवले. त्यापैकी 9 गुन्ह्यांतील महिलांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

दरम्यान, विश्रामबाग हद्दीतील चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी "एलसीबी' चे निरीक्षक बाजीराव पाटील यांना विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार "एलसीबी' चे पथक रेकॉर्डवरील गुन्हेगार आणि संशयितांची तपासणी करत होते. मिरजेतील गांधी चौक पोलिस ठाणे हद्दीत दोन दिवसांपूर्वी पथक पेट्रोलिंग करत होते. तेव्हा सातपुते संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने चेन स्नॅचिंग करत असल्याची कबुली दिली. विश्रामबाग परिसरात 16 ठिकाणी चेन स्नॅचिंग केल्याचे सांगितले.

त्यापैकी 9 गुन्ह्यातील 3 लाख 90 हजार रुपयांचे 13 तोळे दागिने, तीन दुचाकी, मोबाईल असा 4 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सातपुते हा प्रथमच पोलिस रेकॉर्डवर आला आहे. घराचे कर्ज फेडण्यासाठी अशा प्रकारे चोऱ्या करत असल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. एलसीबीचे सहायक निरीक्षक एन. आर. एकशिंगे, सहायक फौजदार विजयकुमार पुजारी, कर्मचारी सागर पाटील, दीपक पाटील, गजानन घस्ते, सुधीर गोरे, संदीप मोरे, प्रकाश पाटील, संदीप पाटील, सतीश आलदर, रवी पाटील, दीपा कोळी यांच्या पथकाने कामगिरी केली.

महिलांना आवाहन-
सातपुते हा एकटाच हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकी, ऍक्‍टीव्हा मोपेडवरून गुन्हा करत होता. अशा प्रकारे एकट्यानेच गुन्हा केल्याचा प्रकार कोणा महिलांबाबत घडला असल्यास "एलसीबी' चे निरीक्षक बाजीराव पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: theft for home loan