त्यांच्या ‘स्वच्छ’ जगण्यासाठी मदतीची गरज

त्यांच्या ‘स्वच्छ’ जगण्यासाठी मदतीची गरज

ना निवारा, ना सुविधा, जेवावे लागते कचऱ्याच्या ढिगावरच; ‘स्वच्छतादूतां’ची व्यथा

सातारा - ते खरे स्वच्छता दूत. कचरा वेचून शहराचे आरोग्य ते राखतात. अशा कचरा वेचकांचेच आरोग्य सतत धोक्‍यात असून आजही त्यांना कचरा डेपोत कचऱ्यातील हातांनी कचऱ्याच्या ढिगावरच बसून जेवावे लागते. ना बूट, ना हातमोजे, ना आरोग्याच्या सुविधा. पालिकेसह समाजाने त्यांच्या ‘जगण्या’ची काळजी घेण्याची गरज आहे.

देशात ‘स्वच्छ भारत’चा नारा सुरू आहे. या अभियानाला खरी मदत होत आहे, ती शहरभर फिरून कचरा वेचणाऱ्यांची, कचरा वेगळा करणाऱ्यांची. मात्र, तेच विविध समस्यांच्या गर्तेत रुतले आहेत. भल्या पहाटेपासून शहराच्या विविध भागात कचरा गोळा करत अनेक महिला, मुले, पुरुष फिरत असतात. तसेच सोनगाव येथील कचरा डेपोत कचऱ्याच्या ढिगांची स्वच्छता करतात. त्यातील प्लॅस्टिक इतर कचरा वेगळा करून तो विकून येणाऱ्या पैशातून पोट भरतात. कचरा वेचणाऱ्यांची समाजात हेटाळणीच केली जाते. पण, ते समस्त नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी मदतच करतात. पण, आपण त्यांचे कार्य आणि मदत सोयीस्करपणे विसरून जातो. या कचरा वेचकांनी पालिकेने ‘स्वच्छता दूत’ म्हणून ओळखपत्रे दिली. पण, नुसती गोंडस ओळख त्यांची उपयोगाची नाही. त्यांना किमान सुविधांची गरज आहे. 

हे स्वच्छता दूत दिवसभर सोनगावच्या कचरा डेपोत उन्हापावसात कचरा वेगळा करतात. पालिकेने या कचरा डेपोत अनेकवेळा मागण्या केल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. मात्र, निवाऱ्याची जागाच नाही. दुर्गंधी अन्‌ घोंगावणाऱ्या माशांच्या साथीत कचऱ्याच्या ढिगावर बसूनच त्यांना घरून आणलेली भाकरी खावी लागते. या डेपोनजीकच त्यांच्यासाठी एखादे शेड उभारण्याची गरज आहे. अनवाणी आणि हातांनी कचऱ्यातच सतत काम करत असल्याने त्यांना व्याधींना सामोरे जावे लागते. तसेच दुर्गंधी तर कायमचीच श्‍वासावाटे त्यांच्या फुफ्फुसात जात असते. त्यामुळेही त्यांचे जगणेच धोक्‍यात येते. पालिकेने या स्वच्छता दूतांना मास्क, हातमोजे, बूट अशा वस्तू पुरविण्याची गरज आहे.
 

गाडगेबाबांना आदरांजली
स्वच्छतेचा वसा जपतानाच या स्वच्छता दूतांनी आज सोनगावच्या कचरा डेपोत स्वच्छतेचे खरे दूत संत गाडगेबाबा यांचा स्मृतिदिनी त्यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी ‘सकाळ’ चे सहयोगी संपादक श्रीकांत कात्रे, कॉम्रेड शिवाजीराव पवार, सुनील उबाळे, गणेश भिसे आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या कचरा वेचकांचे जगणे सुसह्य व्हावे, यासाठी त्यांची संघटना काम करत आहे. श्री. भिसे, श्री. उबाळे तसेच कॉ. पवार त्यांच्या मागण्यांसाठी झटतात. त्यांच्या प्रयत्नातून किमान त्यांचे महत्त्व आणि काम समाजापुढे येत आहे. आता या स्वच्छता दूतांसाठी पालिकेने आणि समाजाने काही ठोस मदतीची गरज निर्माण झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com