...तर राहुरी बसस्थानक बंद करा

... then close the Rahuri bus station
... then close the Rahuri bus station

राहुरी : ""राहुरी बसस्थानकातील अस्वच्छता व दुरवस्थेस अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. एवढ्या मोठ्या स्थानकात वर्षभरापासून प्रवाशांना साधे पिण्याचे पाणी मिळत नाही. साउंड सिस्टिम खराब म्हणून गाड्यांचे अनाउन्सिंग बंद आहे. अशा किरकोळ बाबींवरून निष्काळजीपणा दिसतो. लक्ष द्यायचे नसेल, सुधारणा करायची नसेल, तर बसस्थानक बंद करा,'' अशा कडक शब्दांत माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी नगरचे विभागीय नियंत्रक विजय गिते व एसटीच्या अधिकाऱ्यांना आज सुनावले.

राहुरी बसस्थानकातील बैठकीत तनपुरे यांनी आज एसटीच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. विभागीय नियंत्रक गिते, विभागीय वाहतूक अधिकारी दादाजी महाजन, सुरक्षा व दक्षता अधिकारी भगवान घुगे, श्रीरामपूरचे आगारप्रमुख राकेश शिवदे व स्थानकप्रमुख बाळासाहेब कोते, राहुरीचे स्थानकप्रमुख अनिल निकम व वाहतूक नियंत्रक प्रदीप गलियल उपस्थित होते. 

तनपुरे म्हणाले, ""बसस्थानक आवारात कचऱ्याचे ढीग असतात. प्रवाशांच्या प्रतीक्षालयात अस्वच्छता असते. स्थानक इमारतीला तडे गेलेत. पोर्चचे छत कोणत्याही क्षणी कोसळून प्रवाशांच्या जिवावर बेतू शकते. आठ महिन्यांपासून उपाहारगृह बंद आहे. बस आगारासाठी बालाजी मंदिर ट्रस्टची जमीन घेतली. त्यावर अतिक्रमणे वाढली. तेथे झाडे-झुडपे वाढली. शालेय बसच्या फेऱ्या वारंवार रद्द होतात. विद्यार्थ्यांना घरी जाण्यासाठी बस नसते. मुलींना खासगी वाहनातून प्रवास करताना धोका झाला तर जबाबदार कोण?'' 

नवीन इमारतीचा प्रस्ताव

गिते म्हणाले, ""स्थानक इमारतीचे स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यास सांगितले आहे. स्थानकाच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव व उपाहारगृहाची निविदा काढण्यासाठी मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयाला कळविले आहे. स्थानकातील साउंड सिस्टिम दुरुस्तीला दिली आहे. ती लवकरच सुरू होईल. जलकुंभांची गळती बंद करण्याचे काम सुरू केले आहे. तेथे एक अश्‍वशक्तीचा वीजपंप दिला आहे. लवकरच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होईल. आगारासाठी ताब्यात घेतलेल्या जमिनीच्या मोजणीसाठी भूमिअभिलेखकडे पैसे भरले आहेत. भूमिअभिलेखने सीमा निश्‍चित करून दिल्यावर अतिक्रमणे काढली जातील.'' 

शालेय विद्यार्थ्यांसाठी बसफेऱ्या यापुढे रद्द होणार नाहीत. स्थानकातील व आवारातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाईल, असेही गिते यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com