...तर मराठा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 जून 2018

मराठा क्रांती मोर्चाला राज्य शासनाने दिलेल्या आश्‍वासनांपैकी शैक्षणिक शुल्कातील सवलत वगळता अन्य गोष्टींची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या हक्कांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, अशी भूमिका आज येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चा बैठकीत विविध जिल्ह्याच्या प्रमुख नेत्यांनी मांडली. 

सांगली - मराठा क्रांती मोर्चाला राज्य शासनाने दिलेल्या आश्‍वासनांपैकी शैक्षणिक शुल्कातील सवलत वगळता अन्य गोष्टींची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या हक्कांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, अशी भूमिका आज येथे सुरु असलेल्या राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चा बैठकीत विविध जिल्ह्याच्या प्रमुख नेत्यांनी मांडली. 

भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभासगृगहात ही बैठक सुरु असून सायंकाळी मोर्चाची पुढील दिशा जाहीर केली जाणार आहे. वैष्णवी देसाई आणि वृषाली चव्हाण यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. पिराजी देसाई यांनी स्वागत तर डॉ. संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. पहिल्या सत्रात विविध जिल्ह्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. 

राज्य शासनाने मराठा समाजाच्या महामोर्चानंतर शैक्षणिक सवलत वगळता इतर एकही आश्‍वासन पूर्ण केलेले नाही. अन्य आश्‍वासनांची पूर्तता होईल, असे पाऊल अद्याप उचलले गेले नाही. त्यामुळे समाजाता सरकारविरुद्ध असंतोष खदखदतोय. तो दाखवण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची तयारी करा, अशा सूचना सर्व जिल्ह्यातून देण्यात आल्या. कोपर्डीतील बलात्कार व हत्या प्रकरणानंतर उद्‌भवलेली स्थिती, मराठा समाजाच्या अडचणी, शेतकरी प्रश्‍नावर समाजाने एकत्र लढण्याची गरज यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांना कर्जपुरवठा करण्यास बॅंका नकार देताहेत. अशा बॅंकांविरुद्ध आंदोलन करावे, अशी मागणी करण्यात आली.

Web Title: ... then the Maratha community will have to move on the road again