...तर सोलापूर "कॉंग्रेसमुक्त' 

विजयकुमार सोनवणे
शुक्रवार, 14 जून 2019

सोलापूर : महापालिकेपाठोपाठ लोकसभा निवडणुकीतही कॉंग्रेसचा दुसऱ्यांदा सुपडा साफ झाला. बाजार समितीच्या रूपाने एकच सत्तास्थान उरले होते, तेही भाजपने चाणक्‍यनीतीचा वापर करून हिरावून घेतले. पक्षांतर्गत फितुरीमुळेच हे झाल्याचे उघड झाले. असाच प्रकार सुरू राहिला तर शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघही कॉंग्रेसच्या ताब्यातून जातील आणि सोलापूर शहर-जिल्हा खरोखरच कॉंग्रेसमुक्त होईल. 

सोलापूर : महापालिकेपाठोपाठ लोकसभा निवडणुकीतही कॉंग्रेसचा दुसऱ्यांदा सुपडा साफ झाला. बाजार समितीच्या रूपाने एकच सत्तास्थान उरले होते, तेही भाजपने चाणक्‍यनीतीचा वापर करून हिरावून घेतले. पक्षांतर्गत फितुरीमुळेच हे झाल्याचे उघड झाले. असाच प्रकार सुरू राहिला तर शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघही कॉंग्रेसच्या ताब्यातून जातील आणि सोलापूर शहर-जिल्हा खरोखरच कॉंग्रेसमुक्त होईल. 

कॉंग्रेस म्हटलं की सत्ता आणि सत्ता म्हटलं की कॉंग्रेस हे जणू समीकरणच झाले होते. मात्र, राष्ट्रीय पटलावर नरेंद्र मोदी नावाच्या वादळाचा उदय झाला आणि कॉंग्रेसची मजबूत सत्तास्थाने एक-एक करून ढासळू लागली. परिवर्तन हवे म्हणून मतदारांनी 2014 मध्ये सत्ता बदलली असे म्हणत कॉंग्रेसवाल्यांनी स्वतःचीच समजूत काढली. पण 2019 मध्येही मोदींचा करिष्मा चालला आणि पुन्हा भाजप सत्तेवर आला.

कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये नाराज असलेल्या आजी-माजी आमदार-खासदारांना पक्षात आणून भाजपची संख्या वाढविण्याची त्यांची योजना कमालीची यशस्वी झाली. निवडणुकीपूर्वी मोदी व भाजपच्या नावाने खडी फोडणारे आज मोदींचे स्तुतीपाठक झाले आहेत. त्यात सोलापूरही मागे नाही. शरीराने कॉंग्रेसमध्ये असले तरी मतदान मात्र भाजपच्या उमेदवाराला झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कॉंग्रेसचे अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान कॉंग्रेसच्या एकनिष्ठांसमोर असणार आहे. सध्या स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी प्रसंगी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी साटलोटं करून कॉंग्रेसला अडचणीत आणण्याचे प्रकार सुरू आहेत. मात्र, ही भूमिका त्यांच्यासाठी "बूमरॅंग' ठरणार आहे याची चाहुल लागली आहे. दिलीप मानेंना विरोध करण्याची बाळासाहेब शेळके यांची भूमिका त्याचेच द्योतक आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यात मिळून कॉंग्रेसचे तीन आमदार आहेत. त्यात प्रणिती शिंदे (शहर मध्य), सिद्धाराम म्हेत्रे (अक्कलकोट) आणि भारत भालके (पंढरपूर). पैकी भारत भालके हे बाळासाहेब विखे-पाटील यांच्यासमवेत भाजप नेत्यांच्या बैठकीला गेल्याने ते कोणत्याही क्षणी भाजपवासी होतील अशी स्थिती आहे. आपली आमदारकी टिकवण्यासाठी म्हेत्रे हे भाजपच्या स्थानिक नेत्यांशी तडजोडी करण्यात गुंतल्याची चर्चा बाजार समितीच्या सभापती निवडणुकीनंतर सुरू झाली आहे. राहिला प्रश्‍न शहर मध्यचा. प्रणिती शिंदे याच या मतदारसंघातून उभ्या राहिल्या तरी, त्यांच्यासमोर आता भाजप-शिवसेनेबरोबरच एमआयएम-वंचितचे आव्हान मोठे असणार आहे. ते पेलविण्याची तयारी त्यांनी केली तरी, पक्षातील फितुरांमुळे त्या कितपत यशस्वी होणार याबाबत साशंकताच आहे. कॉंग्रेसमधील फितुरी कायम राहिली तर हे तिन्ही मतदारसंघही कॉंग्रेसच्या हातून जातील आणि सोलापूर खऱ्या अर्थाने कॉंग्रेसमुक्त होईल हे सांगण्यासाठी कुणी भविष्य वर्तविण्याची वेळ येणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: then solapur might be free from Congress