शेतकऱ्यांना निवडता येणार दोन पर्याय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 मे 2017

हे आहेत पर्याय...
 जमिनीच्या मोबदल्यात पैसे
 पर्यायी जमीन 
 मगरपट्टा सिटीच्या धर्तीवरील प्रकल्पामध्ये भागीदारी
 अमरावती व समृद्धी मार्गाच्या धर्तीवर भरपाई

पुणे- पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनाच्या मोबदल्यात ठेवलेल्या चार पर्यायांपैकी कोणतेही दोन पर्याय निवडण्याचा अधिकार शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे भूसंपादनाच्या कामास गती मिळण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे.

पुरंदर येथील पाच गावांतील जागा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी निश्‍चित केली असून, या गावांतील जमिनीचे भूसंपादन करण्यात येणार आहे. त्या मोबदल्यात शेतकऱ्यांना द्यावयाच्या पॅकेजसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत एक बैठक झाली. त्यामध्ये शेतकऱ्यांना जमिनींच्या मोबदल्यात पैसे, पर्यायी जमीन, मगरपट्टा सिटीच्या धर्तीवर प्रकल्पामध्ये भागीदारी आणि आंध्र प्रदेश येथील अमरावती व समृद्धी मार्गाच्या धर्तीवर भरपाई, असे चार पर्याय निश्‍चित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापैकी कोणताही पर्याय शेतकऱ्यांना निवडता येणार आहे. तसेच प्रकल्प पूर्ण होईपर्यंत निर्वाह निधी देण्याचाही निर्णय घेतला आहे.

विशेष म्हणजे शेतकऱ्यांना वरीलपैकी दोन पर्याय निवडण्याची संधीही देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे भरपाईपोटी मिळणाऱ्या पर्यायांमुळे भूसंपादनाचे काम जलदगतीने मार्गी लागण्यास मदत होईल, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: There are two options for farmers to be selected