इथे  आहे गूळ खरेदी-विक्रीवर बंदी.. पण का?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 May 2020

उमदीत हातभट्टी दारू बनवण्यासाठी गुळाचा वापर केला जात असल्याने उमदी पोलिसांनी गूळ खरेदी-विक्री वर बंदी घातली आहे.

सोन्याळ : उमदीत (जि. सांगली) हातभट्टी दारू बनवण्यासाठी गुळाचा वापर केला जात असल्याने उमदी पोलिसांनी गूळ खरेदी-विक्री वर बंदी घातली आहे. उमदी येथील किराणा दुकानदार केवळ नफा न पाहता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या व ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, असे असताना काही दुकानदारांनी गुळाचा साठा करून हातभट्टी दारू तयार करणाऱ्यांना देत आहेत. त्यापासून दारू बनवून तिची चोरून विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे अशा व्यापाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. 

सध्या सरकारी दारू दुकाने बंद असल्याने गावातील काही लोक हातभट्टीकडे वळले आहेत. कर्नाटक राज्यातील चडचण, देवरनिंबर्गी, हिंचगिरी, निवर्गी आदी भागातील लोकही दारू पिण्यास उमदीत येत आहेत. गांभीर्याची गोष्ट म्हणजे कर्नाटकातील निवर्गी गावात कोरोनाच्या पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. त्यामुळे धोका वाढला आहे. 

दारू उत्पादन करणारे उमदीतील किराणा दुकानातून गूळ घेत असतात. दररोजच्या घरच्या स्वयंपाकात गुळाची तितक्‍याच आवश्‍यकता वाटत नाही, त्यामुळे दुकानदार गूळ खरेदी-विक्री करणे बंद केले तरी जास्त नुकसान होणार आहे. गूळ आणि युरिया शिवाय दारू बनवता येत नाही आणि दारू बंद झाल्यास बाहेर गावचे कुणी इथे येणार नाहीत. त्यामुळे गुळाची विक्री करणे कोरोना हटेपर्यंत बंद करावी लागणार आहे.

याच पार्श्वभूमीवर उमदीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर व पोलिस निरीक्षक नामदेव दांडगे, सरपंच निवृत्ती शिंदे यांनी ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेऊन, किराणा दुकानदारांनी गुळाबरोबर तंबाखू, गुटका, बिडी, सिगरेट खरेदी- विक्री करू नयेत अशी सक्त सूचना केली आहे. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही बैठकीत देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is a ban on buying and selling jaggery .. but why?