संस्कराअभावी वाढतेय मुले-मुली पळून जाण्याचे प्रमाण! 

परशुराम कोकणे
बुधवार, 18 जुलै 2018

गेल्या वर्षभरात सोलापूर शहरासह 7 विभागातील 68 पैकी 35 मुला-मुलींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. 

सोलापूर : स्मार्ट फोनचा गरजेपेक्षा अधिक वापर, पालकांचे दुर्लक्ष आणि संस्काराअभावी 14 ते 17 वयोगटातील मुले-मुली प्रेमप्रकरणातून पळून जाण्याचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण अनैतिक मानवी व्यापार, वाहतूक प्रतिबंधक कक्षातील अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. गेल्या वर्षभरात सोलापूर शहरासह 7 विभागातील 68 पैकी 35 मुला-मुलींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. 

सोलापूर पोलिस आयुक्तालयात असलेल्या अनैतिक मानवी व्यापार, वाहतूक प्रतिबंधक कक्षातून नांदेड, परभणी, सोलापूर ग्रामीण, सोलापूर शहर, लातूर, हिंगोली, लोहमार्ग अशा सात विभागांचे कामकाज चालते. अल्पवयीन मुले-मुले पळून गेल्याचा, अपहरण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पाच महिन्यात संबंधित व्यक्तीचा शोध घेण्यात स्थानिक पोलिसांना यश आले नाही तर त्याचा तपास अनैतिक मानवी व्यापार, वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे दिला जातो. गेल्या वर्षभरात 68 पैकी 35 जणांचा शोध घेण्यात अनैतिक मानवी व्यापार, वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश आले आहे. 

सोलापूर शहरातील 8 पैकी 3 जण सापडले असून 5 प्रकरणे प्रलंबित आहेत. नांदेडमध्ये सर्वाधिक प्रमाण असल्याचे पोलिस निरीक्षक संजय पवार यांनी सांगितले. 7 विभागांचे काम पाहण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी असे मिळून फक्त नऊ जणांचे पथक कार्यरत आहे. याठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध व्हावे याकरिता वरिष्ठांकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. 

आश्रम शाळांमध्ये राहणारी, पालकांपासून दूर असलेली मुले-मुली पळून जाण्याचे प्रमाण अधिक आहे. यात 14 ते 17 वयोगटातील मुला-मुलींची संख्या अधिक असून पालकांच्या योग्य संस्कार होत नसल्याने हे प्रमाण वाढत आहे. मुले-मुली अल्पवयीन असल्याने शासनाच्या आदेशानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. आयुष्यात प्रत्येकाला प्रेम करण्याची संधी मिळते. मानसिक आणि शारीरिक तयारी नसतानाही तरुण-तरुणी एकमेकांकडे आकर्षित होतात. प्रेमप्रकरणातून ते पळूनही जातात. पळून गेल्यानंतर होणारा त्रास ते कोणालाही सांगू शकत नाहीत, यातून गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनाही घडू शकतात. 
- संजय पवार, प्रमुख, अनैतिक मानवी व्यापार, वाहतूक प्रतिबंधक कक्ष

Web Title: There is lack of culture awareness in todays generation boys and girl