"गरीब रथ'मध्ये बॉम्ब नाही! 

दत्ता इंगळे 
शनिवार, 30 नोव्हेंबर 2019

रात्री दहा वाजून एक मिनिटांनी गरीब रथ रेल्वेगाडी स्थानकावर आली. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी रेल्वेगाडीचे सर्व डब्यांची तपासणी केली. रेल्वेगाडीमध्ये कोठेही काही आढळून आले नाही. पाच मिनिटे कसून तपासणी केल्यानंतर गरीब रथ रेल्वेगाडी नागपूरच्या दिशेने रवाना झाली.

नगर : पुणे-नागपूर गरीब रथ रेल्वेगाडीमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने नगर शहर पोलिस व रेल्वे पोलिसांनी आज रात्री दहा वाजता नगर रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडीची कसून तपासणी केली. सुमारे दोनशे कर्मचाऱ्यांनी पाच मिनिटांत रेल्वेची तपासणी केली. 

relway

अधिक माहिती अशी : पुणे-नागपूर गरीब रथ रेल्वेगाडीमध्ये बॉम्ब असल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी नगर पोलिसांना माहिती दिली. नऊ वाजता रेल्वेगाडीत बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने नगर पोलिसांनी अग्निशमन बंब, रुग्णवाहिका, राखीव पोलिस फोर्स, बॉम्बशोधक पथक, श्‍वान पथक आदी यंत्रणा रेल्वेस्थानकावर सज्ज ठेवली होती.

रेल्वेगाडी नागपूरच्या दिशेने रवाना

रात्री दहा वाजून एक मिनिटांनी गरीब रथ रेल्वेगाडी स्थानकावर आली. त्यानंतर पोलिस कर्मचाऱ्यांनी रेल्वेगाडीचे सर्व डब्यांची तपासणी केली. रेल्वेगाडीमध्ये कोठेही काही आढळून आले नाही. पाच मिनिटे कसून तपासणी केल्यानंतर गरीब रथ रेल्वेगाडी नागपूरच्या दिशेने रवाना झाली. तपासणीसाठी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्यासह तोफखाना, कोतवाली पोलिस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. 

relway

दौंडमध्येही झाली तपासणी 
दरम्यान, रेल्वेमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्याने दौंड रेल्वे पोलिस आणि जिल्हा पोलिसांनी दौंड रेल्वेस्थानकावरही रेल्वेगाडीची तपासणी केली. 

विघातक वस्तू आढळून आली नाही 
पुणे-नागपूर गरीब रथ या रेल्वेगाडीमध्ये बॉम्ब असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार रेल्वेस्थानकावर रेल्वेगाडीची तपासणी केली असून, कोणतीही विघातक वस्तू आढळून आली नाही. 
- एस. पी. कोतवाल, पोलिस निरीक्षक रेल्वे 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no bomb in the train