घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात अस्वच्छता 

आनंद गायकवाड 
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागते. पाण्याच्या गैरसोयीचा थेट परिणाम स्वच्छतागृहे व शौचालयांच्या स्वच्छतेवर दिसून आला. जनरेटर नसल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास अनेक अडचणी निर्माण होतात. 

संगमनेर : तालुका देखरेख व नियोजन समितीच्या सदस्यांनी नुकतीच घुलेवाडी येथील ग्रामीण 
रुग्णालयाला भेट देऊन तेथील सोयी-सुविधांची पाहणी केली. रुग्णालय इमारतीच्या बाह्य परिसरातील अस्वच्छता पाहून समितीने नाराजी व्यक्त केली. 

मुबलक औषधसाठा 
केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत लोकपंचायत संस्थेमार्फत आरोग्य सेवांवर लोकाधारित देखरेख व नियोजन प्रक्रिया राबवण्यात येते. तालुक्‍यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांशी निगडित 36 गावे, तसेच घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयाचा त्यात समावेश आहे. या पाहणीत रुग्णालयाचे बरे-वाईट पैलू, तसेच तेथील भौतिक सुविधा, यंत्रसामग्रीचा वापर, औषधे व रुग्णसेवेसाठी उपलब्ध इतर बाबींची तपासणी करण्यात आली. दैनंदिन सुमारे 200 बाह्यरुग्णांना येथून सेवा मिळते. मुबलक औषधसाठा, सर्पदंश व श्वानदंशावरील लसींची उपलब्धता आदी बाबी पथकाला आढळून आल्या. 

जनरेटर नसल्याने अडचणी 
स्थानिक ग्रामपंचायतीमार्फत पाणीपुरवठ्यासाठी केवळ पाऊण इंची नळजोड रुग्णालयाला दिला आहे. रुग्णांची संख्या, रुग्णालय स्वच्छता, स्वच्छतागृहे व वापरासह या परिसरातील कर्मचारी निवासस्थानासाठी दैनंदिन किमान 10 हजार लिटर पाण्याची आवश्‍यकता आहे. टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागते. पाण्याच्या गैरसोयीचा थेट परिणाम स्वच्छतागृहे व शौचालयांच्या स्वच्छतेवर दिसून आला. जनरेटर नसल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास अनेक अडचणी निर्माण होतात. 

अनेक पदे रिक्त 
दंतचिकित्सक, एक वैद्यकीय अधिकारी, तसेच सुरक्षारक्षकाची पदे रिक्त आहेत. सोनोग्राफी यंत्र सुरवातीपासून बंद आहेत. रुग्णांना ठरलेल्या खासगी सोनोग्राफी सेंटरमार्फत संदर्भित सेवा मोफत दिली जाते. शवागाराची खोली अत्यंत छोटी असल्यामुळे बाहेरच्या व्हरांड्यात विनावापर अत्याधुनिक शवपेटी ठेवली आहे. प्रतिनियुक्तीवर असलेले डॉ. संदीप कचेरिया यांनी समितीला रुग्णालयाची माहिती दिली. 
जिल्हा परिषद सदस्य सीताराम राऊत, ऍड. मीनानाथ शेळके, डॉ. पांडुरंग गुंड, हनुमंत उबाळे, सोमेश कोटकर, दिलीप शेळके, प्रकल्प समन्वयक सविता पांडे, स्मिता गाडेकर, नलिनी उनवणे, विजयश्री फरगडे आदी उपस्थित होते. 

पुरेसे पाणी मिळत नाही 
रुग्णालयाला पुरेसे पाणी मिळत नसल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. स्वच्छतागृहांसाठी पाणी मिळत नसल्याने रुग्णांसह कर्मचाऱ्यांचे हाल होत आहेत. 
- प्रभारी डॉ. संदीप कचेरिया 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There is no cleaning at Ghulewadi Rural Hospital