साताऱ्यात उद्या पिण्याचे पाणी येणार नाही  

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

पाणी पूरवठ्यावर परिणाम होऊ नये यासाठी पालिकेच्यावतीने तातडीने हालचाली करण्यास प्रारंभ झाला आहे.

सातारा ः सातारा जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसाच्या संततधारमुळे जनजीवन ठप्प झाले आहे. सातारा शहराला पाणी पूरवठा कास धरणानजीकच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने उद्या (मंगळवार) पाणी पूरवठा बंद राहणार आहे. 
सातारा शहरात अद्याप ही पावसाची संततधार सुरु आहे. शहर पोलीस ठाणे ते प्रकाश लॉज ते मुख्य बसस्थानाक या रस्त्यावर रात्री दोनच्या सुमारास झाड पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक पुर्णतः ठप्प झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने सकाळी साडे सहापासून झाड हटविणेच्या काम हाती घेतले आहे. दुपारी चार वाजेपर्यंत या रस्त्यावरील वाहतुक खूली होईल असा अंदाज प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.संगम माहूली येथील कैलास स्माशनभुमी संपुर्णतः पाण्याखाली गेली आहे. परिणामी या नजीक असणाऱ्या स्माशनभुमी अंत्यविधीचे सोपास्कार केले जात आहेत. परंतु ही स्माशनभुमी ही पाण्याखाली जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. करंजे तर्फ सातारा येथील मयूरेश कॉलनीत साचलेले पावसाचे पाणी घरात गेल्याची तक्रार सागर बनसोडे व दिपक बनसोडे आदींनी सातारा पंचायत समिती व शाहूपूरी ग्रामपंचायतीस केली आहे. 
सातारा शहराला पाणी पूरवठा करणाऱ्या कास धरणानजीक यंत्रणेत बिघाड झाल्याने शहराचा पाणी पूरवठा विस्कळीत झाला आहे. पाणी पूरवठ्यावर परिणाम होऊ नये यासाठी पालिकेच्यावतीने तातडीने हालचाली करण्यास प्रारंभ झाला आहे. परंतु त्या ठिकाणी पावसाचा जोर कायम असल्याने काम आज पुर्ण होईल याची शाश्‍वती पालिका देऊ शकत नाही. परिणामी उद्या (मंगळवार) सातारा शहरातील कासचा पाणी पूरवठा बंद राहणार आहे अशी प्राथमिक माहिती पालिकेतून देण्यात आली. सज्जनगडावरील मुख्य प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवरुन मोठ्या प्रमाणात पाणी वाहु लागले आहे. गडावरील सर्वच पायऱ्या निसरड्या झाल्याने भाविकांनी काळजी घेणे आवश्‍यक बनले आहे. 
दरम्यान कऱ्हाडमधील ज्येष्ठ यशवंतराव चव्हाण समाधी परिसर पाण्याखाली गेला आहे. वाईतील धर्मपुरी घाटावार पाणी साचल्याने नागपंचमी निमित्त होणाऱ्या महिलांचा खेळावर परिणाम. लिंब गोवे येथील कोटेश्‍वर मंदिरास पाण्याने वेढा मारला आहे. तांबवे (ता. कऱ्हाड) येथील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने दुकानदारांची धांदल उडाली आहे. बहुतांश दुकानदारांनी दुकानातील साहित्य अन्य ठिकाणी हलविण्यास प्रारंभ केला आहे. वाईचे महागणपती मंदिर पाण्याखाली गेले आहे. या परिसरातील विद्युत पुरवठा सकाळी साडे आठ पासून खंडीत करण्यात आला आहे. जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत विद्युत पूरवठा बंद राहणार असल्याचे महावितरणचे वाई उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता कार्यालयाने कळविले आहे. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be no drinking water in Satara tomorrow