सॅकमध्ये लॅपटॉप अन् कमरेला गावठी कट्टा लावून फिरणाऱ्या चोरट्याला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

सांगली - सांगलीत कॉलेजच्या सॅकमध्ये लॅपटॉप आणि कमरेला गावठी कट्टा लावून फिरणाऱ्या रोहित ऊर्फ दाद्या सुदाम कदम (वय २०, संतोषीमाता मंदिरजवळ, गल्ली नं.१ न्यू विजयनगर, अहिल्यानगर) याला एलसीबी च्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, दोन लॅपटॉप, गावठी कट्टा असा ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सांगली - सांगलीत कॉलेजच्या सॅकमध्ये लॅपटॉप आणि कमरेला गावठी कट्टा लावून फिरणाऱ्या रोहित ऊर्फ दाद्या सुदाम कदम (वय २०, संतोषीमाता मंदिरजवळ, गल्ली नं.१ न्यू विजयनगर, अहिल्यानगर) याला एलसीबी च्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून सोन्या-चांदीचे दागिने, दोन लॅपटॉप, गावठी कट्टा असा ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

सांगली शहर आणि परिसरातील चोरी, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी पोलिस अधीक्षक सुहैल शर्मा, अप्पर अधीक्षक मनीषा डुबुले यांनी ‘एलसीबी’ च्या पथकाला सूचना दिल्या आहेत. एलसीबी चे निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक मिरज विभागात काल रात्री गस्त घालत होते. 

तेव्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार रोहित कदम हा सॅकमध्ये लॅपटॉप घेऊन जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पथक यशवंतनगर येथे आले. आंबा चौकात सापळा रचून रोहितला ताब्यात घेतले. त्याची सॅक ताब्यात घेऊन तपासली असता आतमध्ये दोन लॅपटॉप मिळाले. अंगझडतीमध्ये पॅंटच्या खिशात गावठी कट्टा मिळाला.

अधिक चौकशी केल्यानंतर कुपवाड आणि संजयनगर पोलिस ठाणे हद्दीत घरफोड्या केल्याची कबुली दिली. चोरीचा मुद्देमाल कोठे ठेवला? असे विचारल्यानंतर घरात ठेवल्याचे सांगितले. 
पोलिसांनी घरझडती घेतल्यानंतर चांदीचे वाळे, बिदल्या जोड, पैंजण जोड, जोडवी, अर्धा तोळा सोन्याचे वेढण, सोन्याच्या रिंगा, पानाड्या जोड असा मुद्देमाल मिळाला. त्याच्याकडून ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. रोहितला कुपवाड पोलिसांच्या ताब्यात दिले.

उपनिरीक्षक अंतम खाडे, शरद माळी, सहाय्यक फौजदार युवराज पाटील, सुनील चौधरी, जितेंद्र जाधव, मच्छिंद्र बर्डे, राहुल जाधव, शशिकांत जाधव, सचिन कणप, आर्यन देशिंगकर, प्रशांत माळी, शुभांगी मुळीक, अरुण सोकटे, बजरंग शिरतोडे आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.

वकिलांचे घर फोडले
अहिल्यानगर येथील वकील बाळासाहेब अंकलेकर यांचे बंद घर फोडून रोहितने टीव्ही, लॅपटॉप, सोन्याचांदीचे दागिने चोरल्याचे स्पष्ट झाले असून ॲड. अंकलेकर यांनी कुपवाडमध्ये याबाबत फिर्याद दिली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thief arrested in AhilyaNagar in Sangli