चालण्याच्या स्टाईलवरून पोलिसांनी अवघ्या काही तासांतच लावला चोरीचा छडा

चालण्याच्या स्टाईलवरून पोलिसांनी अवघ्या काही तासांतच लावला चोरीचा छडा

कोल्हापूर - खिडकीच्या अत्यंत निमुळत्या जागेतून प्रवेश करून जुन्या मराठा बॅंकेजवळील मोबाईल दुकान फोडणाऱ्या चोरट्याचा छडा अवघ्या ४८ तासांत लक्ष्मीपुरी पोलिसांनी लावला. सीसीटीव्हीच्या फुटेजवरील चोरट्याच्या चालण्याच्या स्टाईलवरून ही चोरी उघड झाली. याप्रकरणी शहरातील अल्पवयीनाने हा प्रकार केल्याचे उघड झाले. त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून रोकडसह मोबाईल संच असा १ लाख ९ हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी सांगितले.

महापालिकेजवळील जुन्या मराठा बॅंकेसमोरील योगीराज कम्युनिकेशनमध्ये चोरी झाल्याचे ९ एप्रिलला उघड झाले. चोरटा पहिल्या मजल्यावरील खिडकीच्या अत्यंत निमुळत्या जागेतून आत शिरला. त्यानंतर त्याने दुकानातील ७० हजारांहून अधिक रोकडसह सात मोबाईल लंपास केले. हे दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाले. चोरट्याने तोंडाला कापड बांधले होते. परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे पोलिसांनी फुटेज मिळवले. यात मध्यरात्री परिसरातून एक अल्पवयीन मुलगा पाय घसटत चालत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली.

शहराच्या मध्यवस्तीतील एका भागात एक अल्पवयीन मुलगा पाय घसटत जात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यात त्याने केलेल्या चोरीची कबुली दिली. तिची आई भाजी विक्रीचा व्यवसाय करते. त्याला वडील नाहीत, त्याचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्याने एकट्याने ही धाडशी चोरी केली. त्यानंतर चोरीचा ऐवज त्याने तो राहत असलेल्या घराजवळील एका घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत दडवून ठेवला होता. पोलिसांनी त्याच्याकडून सहा मोबाईलसह ७२ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल असा एकूण १ लाख ९ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संबंधित अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी केल्याचे बाबर यांनी सांगितले. 

ही कारवाई उपनिरीक्षक अभिजित भोसले, कर्मचारी अभिजित घाटगे, अभिजित व्हरांबळे, नामदेव पाटील, अजिज शेख, विनायक फराकटे, मुन्ना कुडची यांनी केली. 

डिसेंबरमध्ये केली रेकी
डिसेंबर २०१८ हा अल्पवयीन मुलगा मित्रासोबत दुकानात मोबाईल खरेदीस गेला होता. त्या वेळी त्याने दुकानाची पाहणी केली. दुकानात कोठून शिरता येते आणि बाहेर पडता येते, याची माहिती घेतली. त्यापूर्वी त्याने शहरातील हार्डवेअरच्या दुकानात चोरी करण्याचा प्रयत्नही केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिस निरीक्षक बाबर यांनी सांगितले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com