चोरीसाठी चोरट्यांचा तिकीट काढून प्रवास! 

परशुराम कोकणे
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018

सोलापूर रेल्वे स्थानकावर 24 तासांत सरासरी 90 हून अधिक रेल्वे गाड्या ये-जा करतात. चोरीच्या घटना होऊ नये म्हणून पोलिस दक्ष आहेतच. नागरिकांनीही दक्षता घेण्याची आवश्‍यकता आहे. मोठ्या बॅग, पिशव्या व इतर वस्तू चोरण्याचे धाडस चोरटे करत आहेत. लहानपण वस्तू विशेषतः मोबाईल सहज चोरले जात आहेत. गेल्या दहा महिन्यात मोबाईल चोरीचे 93 गुन्हे दाखल झाले असून यापैकी 25 गुन्हे उघडकीस आले आहेत. 
- मौला सय्यद, पोलिस निरीक्षक, सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाणे

सोलापूर : रेल्वेने प्रवास करणार असाल तर सावधान..! शर्टाच्या खिशात किंवा दिसेल अशाप्रकारे मोबाईल ठेवू नका. तो पॅन्टच्या समोरील खिशात किंवा बॅगेत ठेवा. कारण रेल्वे गाडीत व स्थानकावर मोबाईल चोरीच्या घटना वाढत आहेत. मोबाईल, पर्स यासह छोट्या वस्तूंवर चोरट्यांचा डोळा असून चोरीसाठी तिकीट काढून चोरटे प्रवास करीत असल्याचे समोर आले आहे. 

जानेवारी ते ऑक्‍टोबर 2018 या कालावधीत सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाण्यात 240 गुन्हे दाखल झाले आहेत. यातील 94 गुन्हे मोबाईल चोरीचे आहेत. यापैकी 25 मोबाईल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. प्रवासी रेल्वे स्थानक परिसरात बिनधास्तपणे मोबाईल चार्जिंगला लावून दुसरीकडे निघून जातात. टॉयलेटच्या बाहेरही अनेकदा मोबाईल चार्जिंगला लावून आत गेल्याचे दिसून येते. वेटिंग हॉलमध्ये सुद्धा हीच स्थिती असते. रेल्वे स्थानक परिसरात जाताना शर्टाच्या वरच्या खिशात किंवा दिसेल अशा प्रकारे मोबाईल ठेवणे धोक्‍याचे आहे. 

अलीकडे घडलेल्या अनेक चोरीच्या घटनांमध्ये रेल्वे डब्यात आणि स्थानक परिसरात फिरणारे चोरटे हे तिकीट काढून प्रवास करत असल्याचे समोर आले आहे. चोरी केल्यानंतर चोरटे डब्यातून पुढे निघून जातात. अनेकदा चोरीची घटना घडल्यानंतर लोक डब्यातून बाहेर येऊन चोरट्याचा शोध घेतात, मात्र चोरटा पुढे निघून गेलेला असतो. बहुतांशी चोरटे हे व्यसनाच्या आहारी गेलेले आहेत. गांजा, चरस, दारूसाठी दहा-पंधरा हजारांचा मोबाईल दोन-तीन हजारांना विकला जातो, असे पोलिस चौकशीतून समोर आले आहे. 

हे लक्षात ठेवा 
- रेल्वे डब्यात मोबाईल चार्जिंगला लावून चहासाठी येऊ नका 
- डब्यात चार्जिंग करायचे असेल तर तिथे बसून रहा 
- आपले दुर्लक्ष झाल्याची संधी साधून मोबाईल चोरला जातो 
- नागरिकही साध्या वेशातील पोलिस आहेत 

सोलापूर रेल्वे स्थानकावर 24 तासांत सरासरी 90 हून अधिक रेल्वे गाड्या ये-जा करतात. चोरीच्या घटना होऊ नये म्हणून पोलिस दक्ष आहेतच. नागरिकांनीही दक्षता घेण्याची आवश्‍यकता आहे. मोठ्या बॅग, पिशव्या व इतर वस्तू चोरण्याचे धाडस चोरटे करत आहेत. लहानपण वस्तू विशेषतः मोबाईल सहज चोरले जात आहेत. गेल्या दहा महिन्यात मोबाईल चोरीचे 93 गुन्हे दाखल झाले असून यापैकी 25 गुन्हे उघडकीस आले आहेत. 
- मौला सय्यद, पोलिस निरीक्षक, सोलापूर लोहमार्ग पोलिस ठाणे

Web Title: thief in Solapur