इराणमध्ये अडकलेले ते प्रवासी परतणार 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 मार्च 2020

इराणमध्ये अडकलेले सांगली, कोल्हापुरातील 44 जण अखेर भारतात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांचे कोरोना विषाणूसंसर्गाबाबत वैद्यकीय तपासणीचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सांगली ः इराणमध्ये अडकलेले सांगली, कोल्हापुरातील 44 जण अखेर भारतात परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांचे कोरोना विषाणूसंसर्गाबाबत वैद्यकीय तपासणीचे सर्व अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे शनिवारी रात्री 7.30 वाजता तेहरान विमानतळावरून महान एअरलाईन्सने हे सर्वजण भारताकडे रवाना झाले.

रविवारी पहाटे 3.30 वाजता जैसलमेर (राजस्थान) येथे त्यांचे आगमन होईल. तेथे त्यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी होणार आहे. त्यानंतर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्यास त्यांना त्यांच्या गावी रवाना करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

सांगली, कोल्हापुरातील 44 जण गेल्या 21 फेब्रुवारीला कोल्हापूरच्या एका टूर्स कंपनीमार्फत इराण येथे देवदर्शन आणि प्रवासासाठी गेले होते. ते 27 फेब्रुवारीला भारतात परतणार होते. परंतु जगभरात कोरोनचे थैमान सुरू आहे. खबरदारी म्हणून सर्व देशांत विमान रद्द करण्यात आले होते. त्यामुळे हे सर्वजण इराणमध्ये अडकून पडले होते. त्यांच्या परतीत अडचणी निर्माण झाल्याने त्यांचे भारतातील नातेवाईक चिंताग्रस्त झाले होते. 

दरम्यान, या प्रवाशांना मदत आणि परतीसाठी राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार, सुप्रिया सुळे आदींनी परराष्ट्र मंत्रालयामार्फत इराणमधील भारतीय दूतावासाशी संपर्क साधून त्यांना मदत पोहोचवून दिलासा दिला होता. तसेच त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठीही प्रयत्न केले. तपासणीनुसार सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संसर्ग नसल्याचे स्पष्ट झाले. त्या सर्वांना परतीसाठी आज महान एअरलाईन्सद्वारे भारतात परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Those tourists trapped in Iran will return today