रेमडिसिव्हर इंजेक्‍शनचा काळाबाजार करणाऱ्यांचा हिशेब होईल; पालकमंत्री जयंत पाटील 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

कोविड रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या रेमडिसिव्हर इंजेक्‍शनसाठी सध्या रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे. 

 

सांगली ः रेमडिसिव्हर इंजेक्‍शनचा तुटवडा जाणवत आहे. या संकट काळात काही जण याचा काळाबाजार करत आहेत. त्यांचा नियतीकडूनच हिशेब होईल, अशी उद्विग्न भावना पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज येथे व्यक्त केली. मुस्लिम समाज संचलित हकीम लुकमान कोरोना सेंटरच्या उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

कोविड रुग्णांसाठी वरदान ठरणाऱ्या रेमडिसिव्हर इंजेक्‍शनसाठी सध्या रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे. रेमडिसिव्हरची मागणी अधिक आणि त्या तुलनेत पुरवठा कमी आहे. त्यामुळे काही जण त्याचे दर दुप्पट करून विक्री करत असल्याचे अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. यावर बोलतांना श्री. पाटील म्हणाले,""इंजेक्‍शनचा तुटवडा आहे, मान्य आहे. पण, या संकट काळात गरजू रूग्णांना हे इंजेक्‍शन दुप्पट किंमतीने देणे गैर आहे. काही ठिकाणी असा काळाबाजार चालत असल्याचे समजते आहे. कोरोना संकट काळात सारेच मदतीसाठी पुढे येताहेत, मात्र यात काळाबाजार करणाऱ्यांचा हिशेब मात्र नियतीकडूनच केला जाईल.'' 

ते म्हणाले,""कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. औषधांचा साठा करण्यात आला असून तो लवकरच पुरविण्यात येईल. तसेच सांगली जिल्ह्यात 3319 खाटा असून त्या चार हजार करण्यात येणार आहे. समाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्याने रुग्णांची सोय होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील ताण थोड्याप्रमाणावर कमी होईल.'' 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Those who black market "remedicator" will be held accountable; Guardian MinisterJayant Patil