ठोसेघरचे पर्यटन झाले अधिक सुरक्षित

ठोसेघरचे पर्यटन झाले अधिक सुरक्षित

सातारा - पावसाळ्याचे दिवस म्हटले की आठवण होते ठोसेघरच्या धबधब्याची आणि तेथे आजपर्यंत घडलेल्या दुर्घटनांची! २००१ पासून लागोपाठ सुरू असलेली दुर्घटनांमधील मृत्यूंची मालिका सुदैवाने गेल्या सहा वर्षांपासून खंडित झाली आणि पर्यटकांना ठोसेघरचा धबधबा अधिक सुरक्षित वाटू लागला. पायवाटांवर सुरक्षेसाठी रेलिंग, सीसीटीव्ही कॅमेरे, स्थानिकांच्या निगराणीमुळे दिवसेंदिवस येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वार्षिक २६ हजारांवरून वाढत जाऊन आज दोन लाखांच्या घरात पोचली आहे. 

साताऱ्यापासून २५ किलो मीटरवर असलेले ठोसेघर कासबरोबर पर्यटकांचे प्रमुख आकर्षण केंद्र आहे. विशेषत: वर्षासहलीचा खरा आनंद घ्यायचा असेल तर एकदा ठोसेघरला जाऊन याच, असा आग्रह धरला जातो. ‘विकेंड’ साजरा करण्यासाठी केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर सांगली, कोल्हापूर, पुणे तसेच मुंबई या जिल्ह्यांमधून पर्यटकांची रिघ लागते. कालच्या रविवारी, अवघ्या एका दिवसात पाच हजार पर्यटकांचे पाय ठोसेघरला लागले. 

अपघातांची मालिका खंडित 
पावसाळा सुरू झाला की ठोसेघर धबधब्यात बुडून मृत्यूची एकतरी दुर्घटना घडायची. २००० पासून सुरू झालेल्या या मालिकेने १२ जणांचे बळी घेतले. २०१२ मध्ये ही मालिका खंडित झाली. शासनाच्या निर्णयानुसार सप्टेंबर २०१३ मध्ये स्थानिकांच्या सहभागाने स्थापन झालेल्या ठोसेघर संयुक्त वन व्यवस्थापन समितीने ठोसेघरचे व्यवस्थापन ताब्यात घेतले. समितीच्या स्थापनेनंतर गेल्या सहा वर्षांत ठोसेघर धबधब्यात एकही दुर्घटना अथवा मृत्यूची घटना घडलेली नाही.  संपूर्ण पादचारी मार्गाला लोखंडी ग्रील तसेच चेनलिंग करण्यात आले आहे. बहुतांश ठिकाणी आरसीसी बांधकाम करून पर्यटकांची जास्तीत जास्त सुरक्षितता पाहण्यात आली. 

घळीकडे नवी वाट 
मोठा धबधबा पाहण्यासाठी प्रेक्षक गॅलरी आहे. छोटा धबधबा वरून पाहता येतो. याशिवाय छोट्या धबधब्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी नवीन पायवाट समितीने तयार केली आहे. सुमारे १५० मीटर फरशी तसेच पायऱ्या करून त्याला जाळीदार कुंपण घालण्यात आले आहे. हा नवीन पॉइंट छोट्या धबधब्याच्या पायथ्याला आहे. या धबधब्याच्या पडणाऱ्या पाण्याच्या मागे सुमारे १०० फूट लांब व २० फूट रुंदीची दगडात कोरलेली घळ आहे. सुमारे १०० फूट उंचीवरून पडणाऱ्या या छोट्या धबधब्याच्या पाण्याची गुंज या घळीत गेल्यानंतर ऐकायला मिळते.

आठ सीसीटीव्ही कॅमेरे 
ठोसेघरला १२ वर्षांवरील वयोगटासाठी प्रत्येकी २० रुपये प्रवेश शुल्क आणि पार्किंग आकारले जाते. त्यातून याठिकाणी महत्त्वाच्या ठिकाणी आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यावर दिवसभर निगराणी असते.

वारा-पाऊस याचा आनंद लुटत पर्यटकांना ठोसेघर धबधब्याचे समोरून दर्शन घेता यावे, याकरिता २३५ मीटर लांबीचा झुलता पूल याठिकाणी करणे आवश्‍यक आहे. हा पूल आकारास आल्यास पर्यटकांसाठी ते ठळक आकर्षण ठरेल.
-शंकरराव चव्हाण, अध्यक्ष, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, ठोसेघर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com