‘दिघंची-हेरवाड’साठी हजार बांधकामे पाडणार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 मे 2017

सांगली- दिघंची ते हेरवाड या जिल्ह्यातील पहिल्या टोलमुक्त बीओटी रस्त्यासाठी एक हजाराहून अधिक छोट्या-मोठ्या बांधकामांवर हातोडा चालवला जाणार आहे. शासनाच्या हायब्रीड ॲन्युटी योजनेतून रस्त्यासाठी ४३२ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. त्याचा आराखडा बनवण्याचे काम पुण्यातील खासगी कंपनीकडून सुरू आहे. 

सांगली- दिघंची ते हेरवाड या जिल्ह्यातील पहिल्या टोलमुक्त बीओटी रस्त्यासाठी एक हजाराहून अधिक छोट्या-मोठ्या बांधकामांवर हातोडा चालवला जाणार आहे. शासनाच्या हायब्रीड ॲन्युटी योजनेतून रस्त्यासाठी ४३२ कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत. त्याचा आराखडा बनवण्याचे काम पुण्यातील खासगी कंपनीकडून सुरू आहे. 

सुमारे १३५ किलोमीटरचा हा रस्ता आटपाडी, सांगोला, कवठेमहांकाळ, मिरज, शिरोळ तालुक्‍यातून कर्नाटकात हेरवाडला जोडला जाणार आहे. या पट्ट्यात २४ मीटर रुंदीची जमीन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ताब्यात घेतली जाणार आहे. या जमिनीची मालकी या विभागाकडेच आहे. लोकांनी त्यावर शेती, बांधकामे, शेड, दुकाने याद्वारे अतिक्रमण केले आहे. ते हटवले जाणार आहे. 

दोन वर्षांपूर्वीपर्यंत जिल्हा परिषदेच्या मालकीचा  असलेला रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आल्यानंतर त्याला राज्यमार्गाचा दर्जा मिळाला आहे. तो आता ‘राज्यमार्ग क्रमांक १५३’ म्हणून ओळखला जातो. सध्या रस्ता केवळ १० फूट रुंदीचा आहे. तो ७ मीटर म्हणजे २१ फुटांहून अधिक रुंदीचा केला जाणार आहे. तो दुहेरी असल्याने दुभाजकही बांधले जाणार आहेत. याशिवाय दोन्ही बाजूला खडीकरणाच्या पट्टया केल्या जाणार आहेत. त्यानंतर गटारी असतील. त्यामुळे २४ मीटर रुंदीची जागा पूर्णपणे वापरात येणार आहे.

हायब्रीड ॲन्युटी योजना
राज्य शासनाने राज्य मार्ग विकासांसाठी हायब्रीड ॲन्युटी योजना सुरू केली आहे. त्यात राज्य मार्गाच्या प्रस्तावित खर्चाच्या ४० टक्के रक्कम राज्य शासन खर्च करेल, उर्वरित ६० टक्के रक्कम ठेकेदाराने खर्च करायची  आहे. ती टोलमधून वसूल केली जाणार नाही. राज्य शासन या रकमेचा परतावा काम पूर्ण झाल्यानंतर १२ वर्षांत समान हप्त्यात देईल. त्यावर व्याजही दिले जाईल. बांधा, वापरा, हस्तांतरित करा तत्त्वावर, मात्र टोलशिवायचा रस्ता असेल.

असा जातो राज्यमार्ग 
दिघंची, आटपाडी (ता. आटपाडी), कोळे, पाचेगाव  (ता. सांगोला), घाटनांद्रे, तिसंगी, कुंडलापूर, कुची, कवठेमहांकाळ, हिंगणगाव, कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ), सलगरे, बेळंकी, शिपूर, एरंडोली, टाकळी, मिरज (ता. मिरज), शिरोळ, कुरुंदवाडमार्गे हेरवाड (कर्नाटक)

Web Title: Thousand constructions to be built for Digha-Herwad