हजारो एकर डाळिंबक्षेत्र पाण्यात; आटपाडीत पावसाचा कहर

नागेश गायकवाड
Sunday, 20 September 2020

अती पावसामुळे तालुक्‍याचे हुकमी फळपीक असलेल्या हजारो एकर डाळिंबाचे क्षेत्र पाण्यात बुडाले असून शेतीच्या इतिहासात या वर्षी सर्वाधिक विक्रमी नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

आटपाडी (जि. सांगली ) ः आटपाडी तालुक्‍यात पावसाने कहर केला आहे. पावसाने साडेपाचशे मिलिमीटरची नोंद गाठली आहे. अती पावसामुळे तालुक्‍याचे हुकमी फळपीक असलेल्या हजारो एकर डाळिंबाचे क्षेत्र पाण्यात बुडाले असून शेतीच्या इतिहासात या वर्षी सर्वाधिक विक्रमी नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

आटपाडी तालुक्‍यात तीन महिन्यांपासून तालुक्‍यात सतत कमी अधीक पाऊस पडत आहे. दीड महिन्यांपूर्वी सलग एक महिनाभर सूर्याचे दर्शन झाले नव्हते. तर चार दिवसांपासून तालुक्‍यात पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. अवर्षणप्रवण असलेल्या आटपाडीत विक्रमी 554 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. साऱ्या गावचे ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. अनेक गावचे अनेक पूल पाण्याखाली गेले असून वाहून गेले आहेत.

या पावसाने मोठे नुकसान केले आहे. अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडीचे हुकमी उत्पादन म्हणून डाळिंबाकडे पाहिले जाते. डाळिंबाला जादा पाऊस आणि आद्रता चालत नाही मात्र या वर्षी आद्रता आणि पावसाने कहर केला आहे. सलग महिनाभर ढगाळ हवामान आणि ज्यादा आद्रतेमुळे मोठी फुलगळ झाली. त्यानंतर पाकळी करपा आणि फळकूज रोगाने धुमाकूळ घातला.

यातच चार दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातल्याने हजारो एकर डाळिंब बागा अक्षरश: पाण्यात बुडाल्या आहेत. बागात एक ते दोन फूट पाणी साचून राहिले आहे तर काही ठिकाणी पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. यामुळे मूळ आणि मूळकूज होऊन पूर्ण बागा वाया जाणार आहेत. 

या वर्षीचा हंगाम वाया

कौठूळी येथील किरण कदम यांची ओढ्यालगत डाळिंबाची बाग आहे. चार महिने बागेला हंगाम धरून झालते. ओढ्याला प्रचंड आलेले पाणी बागेत शिरले आणि डाळिंबाची झाडे पाण्याच्या प्रवाहाने उन्मळून पडली आहेत. त्यांचा या वर्षीचा हंगाम वाया गेला आहेच शिवाय डाळिंबाची पूर्ण भाग उद्‌ध्वस्त झाली आहे. 

संपादक : युवराज यादव 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of acres of pomegranate fields in water; Rainstorm in Atpadi