नव्या निळ्या पूररेषेत हजारांवर बांधकामे;  सांगली शहरालगतच्या पाचशेंवर एकर परिसरातील बांधकामांवर निर्बंध

जयसिंग कुंभार
Saturday, 5 December 2020

जलसंपदा विभागाने नव्याने निश्‍चित केलेल्या निळ्या पूररेषेमुळे सांगली शहरातील कृष्णाकाठ परिसरातील नागरी विभागातील नव्या बांधकामांवर मर्यादा आल्या आहेत.

सांगली ः जलसंपदा विभागाने नव्याने निश्‍चित केलेल्या निळ्या पूररेषेमुळे सांगली शहरातील कृष्णाकाठ परिसरातील नागरी विभागातील नव्या बांधकामांवर मर्यादा आल्या आहेत. गेल्या पंचवीस वर्षांतील पुराच्या वारंवारितेचा अभ्यास करून आता नवी निळी रेषा आता अधिक विस्तारली आहे. या निळ्या पूररेषेत बायपास रस्ता परिसर, गवळी गल्ली, वखारभाग, इदगाह मैदान परिसर, कर्नाळ रस्ता परिसर येथील सुमारे हजारांवर बांधकामे येतील असा अंदाज आहे. त्यामुळे आता या परिसरात नव्याने बांधकाम परवाने दिले जाणार नाहीत. 

नव्या निळ्या पूररेषेच्या नकाशानुसार सांगली शहरातील गट क्रमांक 121 (इदगाह मैदान), गट क्रमांक 99 (ट्रक पार्किंग परिसर), गट क्रमांक 16 व 18 कर्नाळ रस्ता दफनभूमी, सांगलीतील रिझर्व्हड सर्व्हे क्रमांक 140, 10, 4 (गवळी गल्ली, विष्णू अण्णा पाटील समाधीस्थळ, गणपती मंदिराच्या मागील बाजूचा भाग, जनावराचा बाजार, आयर्विन पूल परिसर, अमरधाम परिसर), सांगलीवाडीतील गट क्रमांक 240, 239, 256, हरिपूर रस्त्यावरील सर्व्हे क्रमांक 563, गट क्रमांक 117 (मल्टीप्लेक्‍स परिसर), गट क्रमांक 124 (बायपास ओतभाग), गट क्रमांक 131 (बायपास रस्ता), कर्नाळ रस्ता गट क्रमांक 82, 87, शेरीनाल्यालगतचे गट क्रमांक 50, 51, 54, 56, 49, 48, 47, 73, 76, 71, 81, 575, 136, 80, 87, 133, 123 आदी परिसर नव्या निळ्या पूररेषेत समाविष्ट झाला आहे. गेल्या पंचवीस वर्षांत शहर विस्तारताना या टापूत नव्याने सुमारे हजारांवर बांधकामे झाली असल्याचा अंदाज आहे.

ही सर्व बांधकामे होत असताना महापालिकेतील यंत्रणेने आधीच्या निळ्या पूररेषेला आधीन राहून परवानग्या दिल्या आहेत. त्यातली बहुतेक बांधकामे आधीच्या निळ्या पूररेषेच्या काठावरील तरी आहेत किंवा थोड्या पळवाटा काढून दिलेल्या आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा या बांधकामांवरील पुराचे सावट निश्‍चित झाले आहे. जुन्या बांधकामांना या रेषेचा फटका बसणार नाही, मात्र त्यांचा पुनर्विकास किंवा या भागात नव्याने होणाऱ्या बांधकामांवर आता निर्बंध येतील. 

निळी-लाल पूररेषा म्हणजे काय? 
जलसंपदा विभागाच्यावतीने दर पंचवीस वर्षांतून निळी पूर रेषा तर दर शंभर वर्षांतून लाल पूर निश्‍चित केली जाते. पंचवीस किंवा शंभर वर्षांत येणाऱ्या पुराची सरासरी निश्‍चित करून या रेषा आखल्या जातात. निळ्या पूररेषेत बांधकामांना पूर्ण मनाई असते. तर लाल पूररेषेत काही अटींना अधिन राहून बांधकामांना परवानगी दिली जाते. यावर्षी जलसंपदा विभागाने नवी पूररेषा निश्‍चित केली असून ती ई जलसेवा पोर्टलवर (82/82 सांगली शहर) हा नकाशा उपलब्ध आहे. 

नवी लाल पूररेषा लवकरच? 
जलसंपदा विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नव्या निळ्या पूररेषेचा गतवर्षीच्या महापुराच्या पाण्याचा संबंध नाही. कारण हा महापूर शतकातला सर्वोच्च होता. सध्याची लाल पूर रेषा ही 1914 च्या महापुरानंतर आखलेली आहे. आता नव्याने लाल पूररेषा निश्‍चित करताना गतवर्षीच्या म्हणजे 2019 च्या महापुराच्या पाणी पातळीचा विचार केला जाईल. शंभर वर्षांतील पुराची वारंवारता निश्‍चित केली, तर आता ही लाल पूररेषाही नक्की विस्तारणार आहे. त्यावेळी पुन्हा नव्याने या टापूतील बांधकामांवर मर्यादा येतील. त्यावेळी कदाचित शहरातील सध्याच्या व्यापार पेठांमधील जमिनीवरील मजला पूर्णतः पार्किंगला सोडावा लागेल. तसेच या परिसरात तळमजले काढता येणार नाहीत. 

नवा नकाशा पालिकेकडे उपलब्ध
जलसंपदा विभागाने नवी निळी पूररेषा निश्‍चित केली आहे. त्यातील गट क्रमांकांचा नवा नकाशा पालिकेकडे उपलब्ध झाला आहे. यापुढे या गट क्रमांकामध्ये बांधकाम परवानगी दिली जाणार नाही. याची दखल मालमत्ताधारक तसेच बांधकाम व्यावसायिकांनी घ्यावी. 
- एम. ए. मुल्ला, सहाय्यक संचालक (प्रभारी) नगररचना 

लाल पूररेषेत अटींसह परवानगी
निळ्या पूररेषेत बांधकामांना परवानगी मिळत नाही, तर लाल पूररेषेत अटींसह परवानगी मिळते. नव्या निळ्या रेषेत कोणते गट क्रमांक आले आहेत याची माहिती घेऊनच मालमत्ताधारकांनी व्यवहार करावेत. बांधकाम व्यावसायिकांनीही याचे भान ठेवणे गरजेचे आहे. 
- दीपक सूर्यवंशी, राज्य कार्यकारिणी सदस्य, क्रेडाई 

संपादन : युवराज यादव


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thousands of constructions in the new blue floodline; Restrictions on construction on 500 acres of land near Sangli city