बनावट नोटांचे धागेदोरे परराज्यात?

संजय काटे
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

तालुक्‍यात पकडलेल्या बनावट नोटांचे रॅकेट थेट परराज्यापर्यंत जात आहे. अटक केलेले दोन्ही आरोपी या रॅकेटमधील अखेरची कडी आहेत. त्यात अनेक बड्यांचा समावेश व्यक्त होत असून, श्रीगोंदे पोलिस त्याचा कसून तपास करीत आहेत.

श्रीगोंदे : तालुक्‍यात पकडलेल्या बनावट नोटांचे रॅकेट थेट परराज्यापर्यंत जात आहे. अटक केलेले दोन्ही आरोपी या रॅकेटमधील अखेरची कडी आहेत. त्यात अनेक बड्यांचा समावेश व्यक्त होत असून, श्रीगोंदे पोलिस त्याचा कसून तपास करीत आहेत. बारामती येथील एका मास्टर माईंडवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, तो या रॅकेटमधील महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. 

सुपे येथील अतुल आगरकर याच्या वाहनातून दोन लाख 83 हजारांच्या बनावट नोटा जप्त केल्यापासून या प्रकरणाची व्याप्ती वाढतच आहे. बारामती येथून श्रीकांत माने याला अटक केली. मात्र, हे दोघेही या प्रकरणातील शेवटची कडी असल्याचे समोर आले. बारामती येथील अजून काही जण या प्रकरणात गुंतले असून, पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

बारामती येथील एक चालक या पूर्ण प्रकरणाचा मास्टर माईंड असल्याचे समजतेय. खऱ्या नोटांच्या कलर प्रिंट करून त्या चलनात आणण्याचा उद्योग करणारे हे रॅकेट पुण्यातील एका महिलेच्या इशाऱ्यावरून चालत असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोलिस पोचले आहेत. बारामती व पुणे येथे केंद्रित असणारा पोलिसांचा तपास कर्नाटकपासून हैदराबादपर्यंत जाऊ शकतो, असे सूत्रांकडून समजले. 

आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे नोटा झेरॉक्‍स करून देणारे व त्या चलनात आणणाऱ्या वेगवेगळ्या टीम आहेत. हे दोघेही मध्यस्थाच्या भूमिकेत असल्याचे समोर आले आहे. मात्र, दोघे आरोपी सराईत असल्याने पोलिस त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. बनावट नोटा प्रकरणात बडे मासे असण्याची शक्‍यता आहे. ते गळाला लागले, तर या प्रकरणी निश्‍चित माहिती हाती येऊ शकते. 
सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावित म्हणाले, ""आम्ही हे प्रकरण अतिशय गंभीरतेने घेतले असून, त्यात वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन तपास सुरू आहे.'' 

 

निवडणुकीदरम्यान वापराची भीती 

पुणे व बारामती पोलिसांची श्रीगोंदे पोलिसांनी मदत घेतली. विधानसभा निवडणुकीतही बनावट नोटांचा वापर झाला का, याचा शोध पोलिस घेत आहेत. तसे असल्यास मोठ्या प्रमाणात राज्यात या बनावट नोटा चलनात येऊ शकतात, अशी शंका उपस्थित होत आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threads of fake notes in a foreign state?