टॉवरवर चढून नोकरीसाठी आत्महत्येची धमकी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

सांगली : नोकरीच्या मागणीसाठी इटकरे (ता. वाळवा) येथील अनिल कुंभार (वय 25) या तरूणाने आज स्टेशन चौकातील दुरसंचारच्या कार्यालयाच्या आवारातील सहाशे फूट टॉवरवर चढून प्रशासनास वेठीस धरले. सुमारे पाच तास त्याने भर पावसात टॉवरवरच बैठक मारली आणि अखेर सायंकाळी अग्निशमन व पोलिस दलाच्या नोकरीच्या आश्‍वासनावर विश्‍वास ठेवून तो खाली उतरून जेत्याच्या थाटात प्रसिध्दी माध्यमांसमोर अवतरला.

वाळवे तालुक्‍यातील इटकरेचा रहिवासी असलेला अनिल कला शाखेचा पदवीधर आहे. आई आणि मोठा भाऊ असे त्याचे कुटुंब. यापूर्वी त्याने सैन्यात भरतीसाठी केलेले प्रयत्न अपयशी ठरले होते. त्यामुळे निराशेच्या भरात आज त्याने हा फंडा स्विकारला. सकाळी साडे अकराच्या सुमारास त्याने सर्वांचा डोळा चुकवून टॉवरवर स्वारी केली. तब्बल सहाशे फूट उंचीवर तो गेला खरा मात्र तिथे तो गेल्याचेही कोणाच्या लक्षात आले नाही. त्यामुळे त्याने तिथून नटबोल्ट व अँगल खाली टाकत सर्वांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतरही कोणी त्याच्याकडे लक्ष दिले नाही. त्यानंतर त्याने अग्निशमन अधिकारी एस. एस. देसाई यांना दुरध्वनीवरून संपर्क साधला. "मला नोकरी मिळत नाही, त्यासाठी मी टॉवरवर चढलोय.' असे त्याने सांगितले. 

त्यानंतर सर्वांना त्याच्या या प्रतापाची माहिती झाली. 
अग्निशमन दल आणि पोलिस तेथे धावल्यानंतर मग समजुत घालण्याचे सत्र सुरु झाले. तो फक्त हातवारे करीत होता. त्याला खाली उतरवण्यासाठी एवढी मोठी क्रेन शक्‍यच नव्हती. तो व्यवस्थित आहे का हे पाहण्यासाठी एकाने ड्रोन आणण्याचाही सल्ला दिला. हा खेळ बराच वेळ चालला. गावाकडून त्याच्या कुटूंबियांनाही बोलवण्यात आले. बघ्यांनी या मोहिमेत भाग घेतला. शेवटी तो खाली आला आणि त्याने जेत्याच्या थाटात मिडियाला बाईट दिली.

Web Title: The threat of suicide for a job climbing to the tower