कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावर चोवीस तासांत तीन अपघात
कुर्डुवाडी (जिल्हा सोलापूर) : कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावर शनिवार सायंकाळी पाच ते रविवारी सायंकाळी पाच यादरम्यान चोवीस तासांत तीन वेगवेगळे अपघात झाले. त्यापैकी दोन अपघातात दोघेजण ठार झाले.
कुर्डुवाडी (जिल्हा सोलापूर) : कुर्डुवाडी-बार्शी रस्त्यावर शनिवार सायंकाळी पाच ते रविवारी सायंकाळी पाच यादरम्यान चोवीस तासांत तीन वेगवेगळे अपघात झाले. त्यापैकी दोन अपघातात दोघेजण ठार झाले.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास म्हैसगाव ता माढा येथे रामचंद्र सातव (रा म्हैसगाव) हे आपल्या मुलासह दुचाकीवरुन जात होते. त्यावेळी पुणे-उदगीर (क्रमांक एमएच 45 बी एल 3836) या एसटीची व दुचाकीची धडक झाली. यामध्ये दुचाकीस्वारासोबत असलेला मुलगा विश्वनाथ सातव( वय 9 वर्षे) हा जखमी झाला. त्याला उपचारासाठी बार्शी येथे नेण्यात आले होते. रात्री उशीरा विश्वनाथचा मृत्यू झाला. इतर दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत.
दुस-या घटनेत रविवारी सकाळी सातच्या सुमारास कुर्डुवाडी बार्शी रस्त्यावरील रिधोरे येथील एका शाळेजवळ ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर (क्र. एम एच 45 एफ 1593) आणि बार्शीहून कुर्डुवाडीकडे जाणारी कारची धडक झाली. कारमधील चालक गोरक्षनाथ यादव व त्यांचे सहकारी यांनी सीटबेल्ट बांधले होते. धडक होताच कारमधील एअरबॅग उघडल्या गेल्या व दोघेही बचावले. कार मात्र रस्त्यालगत असलेल्या चारीमध्ये गेली. यामध्ये दोन्ही गाड्यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे.
तिस-या घटनेत रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास रिधोरे पुलाजवळ एका चारचाकीने दुचाकीस्वारास धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच मृत्यू झाला. अब्दुल काशीम शेख ( रा बारामती, हल्ली रा पुणे) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. शेख हे दुचाकी (क्रमांक एमएच 10 क्यु 6635) वरुन पुणे येथून गाडेगाव ता. बार्शी येथे जात होते. रिधोरे पुलानजिक चारचाकी ( क्रमांक एमएच12 पी क्यु 0130) ने जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की अपघातानंतर दुचाकीस्वाराचा मेंदू रस्त्यावर पडला होता. कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरु होती.