महापालिका क्षेत्रात तीनशेजण होम क्वारंटाईन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 मार्च 2020

सांगली, ता. 31 : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिका क्षेत्रात सुमारे तीनशेजण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. या सगळ्यांवर महापालिकेचे आरोग्य अधिकारी लक्ष ठेवून आहेत. वैद्यकीय पथक दिवसातून दोनवेळा या नागरिकांची तपासणी करत आहेत. 

सांगली,  इस्लामपूरमध्ये एकाच कुटुंबातील 24 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर सांगलीचे नाव देशाच्या पटलावर आले. एका सामान्य शहरात इतके कोरोनाबाधित सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. राज्यात मुंबई पुण्यानंतर सांगलीचे नाव कोरोनाबाधितांच्या यादीत आले. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने परदेशवारी करुन आलेल्या नागरिकांची कसून तपासणी करुन त्यांना होम क्‍वारंटाईन केले आहे. 

जिल्ह्यात सध्या एक हजारहून अधिकजण परदेशातून परतलेले नागरिक आहेत. हा आकडाही दर दिवशी वाढत आहे. आजवर 963 जण जिल्ह्यात होम क्वारंटाईन असून त्यातील 292 जण महापालिका क्षेत्रात आहेत. त्यांना महापालिका प्रशासनाने घरातून बाहेर न पडण्याची सक्त ताकीद दिली आहे. तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. सध्या तरी यातील कुणाला कोरोनाची लक्षणे नाहीत. मात्र त्यांना 14 दिवस घरातच कुणाशीही संपर्क न करता रहावे लागणार आहे. 

गेल्या आठवड्यात इस्लामपूरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीच्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये आता सांगली महापालिकेकडून महापालिका क्षेत्रात होम क्‍वारंटाईनचा सल्ला दिलेल्या तसेच परदेशवारीहून आलेल्या नागरिकांवर करडी नजर ठेवली जात आहे. महापालिकाचे आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, सहायक आयुक्त एस. एस. खरात तसेच स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, पंकज गोंधळे हे शहरातील होम क्वारंटाईनचा सल्ला दिलेल्या परदेशवारीहून आलेल्या नागरिकांची माहिती घेत ते आपल्या घरीच आहेत का याची खात्री करत आहेत. 

20 पथके 
महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार महापालिका क्षेत्रातील तीनही शहरात परदेशातून आलेल्या नागरिकांना होम क्‍वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे. हे नागरिक आपल्या घरी आहेत का? ते खबरदारीबाबत काय काळजी घेतात? याची चौकशी रोज केली जात आहे. यासाठी महापालिकेने 20 पथके केली आहेत. त्यांच्या माध्यमातून सकाळी आणि सायंकाळी या नागरिकांची चौकशी करण्यात येत आहे. त्यांचा 14 दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपला की त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three hundred home quarantines in the municipal area