सांगोला- मिरज रस्त्यावर तिहेरी अपघात; तीन ठार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

- सांगली जिल्ह्यातील दोघे, कोल्हापूर जिल्ह्यातील एकाचा समावेश 
- दोघे जण गंभीर जखमी 
- दोन पिकअप, एका दुचाकीची धडक 

सांगोला : दोन पिकअप व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या तिहेरी विचित्र अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले. अजित रंगराव तुरूळे (वय 35), सागर रघुनाथ पडळकर (वय 38, दोघेही रा. कुकटोळी, ता. कवठेमंकाळ, जि. सांगली) व अक्षय आनंदा जाधव (वय 23, रा. तारदाळ, ता. इचलकरंजी) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. हा अपघात सांगोला- मिरज रस्त्यावरील जुनोनी गावाजवळ बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास घडला. 
जोतिबा अण्णासाहेब मोटे (रा. रांगोळे, ता. हातकणंगले) हे पिकअप (एमएच 09-ईएम 8660) घेऊन जुनोनीहून इचलकरंजीकडे निघाले होते. त्यांच्यासोबत अक्षय आनंदा जाधव (रा. तारदाळ, ता. हातकणंगले) होता. तर सुदाम खंडू पन्हाळकर (रा. नालवंडी, ता. पाटोदा, जि. बीड) हे सांगलीहून पिकअप (एमएच 23- 5019) पंढरपूरकडे निघाले होते. तर अजित रंगनाथ तुरळे व सागर रघुनाथ पडळकर दोघे हे दुचाकीवरून (एमएच 10-बीओ 7376) लग्नकार्य आटोपून गावाकडे निघाले होते. दुपारी तीनच्या सुमारास जुनोनी गावाजवळ पिकअप (एमएच 23 - 5019) व दुचाकी यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात अजित रंगराव तुरूळे व सागर रघुनाथ पडळकर हे गंभीर जखमी झाल्याने जागीच ठार झाले. यानंतर या अपघातग्रस्त पिकअपला

इचलकरंजीकडे जाणाऱ्या पिकअपने जोराची धडक दिली. या धडकेत पिकअपमधील अक्षय आनंदा जाधव हा जागीच ठार झाला. तर पिकअप चालक जोतिबा अण्णासाहेब मोटे (रा. रांगोळे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) व सुदाम बंडू पन्हाळकर (रा. नालवंडी, ता. पाटोदा, जि. बीड) हे दोघे जखमी झाले. या विचित्र अपघातात दुचाकीवरील दोघांसह तिघांना आपला जीव गमवावा लागला. तर दोन्ही पिकअपचे चालक जखमी झाले आहेत. अपघातातील दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. तर दोन्ही पिकअप उलटले. परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमींना व मृतदेहांना पोलिसांनी बाहेर काढले. हा अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या भीषण अपघाताचे वृत्त समजताच पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातातील मृतदेह सायंकाळी सात वाजता उत्तरीय तपासणीसाठी सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three killed on Sangola- Miraj road in accident