शिवसैनिकांचे दुहेरी हत्याकांड; नगरमध्ये तीन मंत्री दाखल 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 एप्रिल 2018

शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे खुन प्रकरणाने नगर येथील परिस्थिती चांगलीच तापली आहे. या पार्श्वभुमीवर गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यटनमंत्री रामदास कदम नगरमध्ये दाखल झाले आहेत.

नगर - शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या खून प्रकरणानंतर आज नगरमध्ये तणावपूर्ण वातावरण असून, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यटनमंत्री रामदास कदम नगरमध्ये दाखल झाले आहेत. सर्व आरोपींना अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नसल्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. 

शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांचा काल धारदार शस्त्राने व गोळ्या झाडून खून करण्यात आला. यातील आरोपी संदीप गुंजाळ याने पारनेर पोलिस ठाण्यात हजर होत हे खून केल्याची कबुली दिली आहे. तसेच त्यासाठी वापरण्यात आलेले हत्यारेही सादर केले आहेत. मात्र यामागे राजकीय कारण असून, मुख्य आरोपींचा शोध घेण्याची मागणी वाढत आहे. कोतकर यांचे चिरंजीव संग्राम कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीत या खुनामागे आमदार संग्राम जगताप, आमदार अरूण जगताप, आमदार शिवाजी कर्डिले, आजारपणामुळे जामिनावर असलेले भानुदास कोतकर असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या प्रमुख आरोपींना अटक करण्याची मागणी शिवसेनेने लावून धरली. 

आमदार संग्राम जगताप यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर रात्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस अधीक्षक कार्यालयात धुडगूस घालून तोडफोड केली. तसेच तेथील काही कर्मचाऱ्यांना मारहाण करून आमदार जगताप यांना घेऊन गेले. पोलिस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 22 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना दुपारी न्यायालयात नेण्यात आले होते. तसेच दुहेरी खून प्रकरणात आज पहाटे आमदार संग्राम जगताप यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. या घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे शहरातून मोर्चा काढण्यात आला. या दरम्यान, केसरकर, रावते, कदम नगर शहरात दाखल झाले. त्यांनी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, शहरप्रमुख दिलीप सातपुते यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. मंत्री घटनास्थळी व घटनेत मृत झालेल्यांच्या नातेवाईकांची भेट घेण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे आमदार जगताप यांना विनाकारण अटक केल्याचे सांगत राष्ट्रवादीही शहरात मोर्चा काढण्याच्या तयारीत आहे. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Three ministers have been present in Nagar for Sanjay Khotkar Murder Case