Sangli Crime News: सांगली हादरली! पोरानं ट्रॅक्टरखाली चिरडून बापाचा केला खून; एरंडोलीत धारदार शस्त्रानं पत्नीनंच पतीला भोसकलं | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sangli Crime News

Sangli Crime News: सांगली हादरली! पोरानं ट्रॅक्टरखाली चिरडून बापाचा केला खून; एरंडोलीत धारदार शस्त्रानं पत्नीनंच पतीला भोसकलं

Sangli Crime News : सांगली जिल्ह्यात काल बेडग (ता. मिरज) येथे ट्रॅक्टरखाली चिरडून वडिलांचा, एरंडोलीजवळील आरग साखर कारखान्याजवळील बेघर वसाहतीमधील पारधी वस्तीत पतीचा व आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे वेटरनेच वेटरचा खून केला. याप्रकरणी मिरज ग्रामीण व कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

ट्रॅक्टरखाली चिरडून बापाचा केला खून

आरग : बेडग (ता. मिरज) येथे शेतजमीन, आर्थिक वादातून ट्रॅक्टरखाली चिरडून मुलाने बापाचा खून केला. दादू गणपती आकळे (वय ५८) असे मृताचे नाव आहे. संशयित लक्ष्मण दादू आकळे (वय ३२, बेडग) याला अटक केली. बुधवारी (ता. २४) सकाळी ही घटना घडली. मिरज ग्रामीण पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद आहे.

पोलिसांनी माहिती दिली, की बेडग येथे उपार-आकळे लोकवस्ती आहे. दादू आकळे व त्यांचा मुलगा लक्ष्मण आकळे राहतात. बापलेकांत काही दिवसांपासून पैसे व जमीन नावावर करण्यावरून वाद सुरू होता.

लक्ष्मण दादू यांच्याकडे सतत पैशाची मागणी करीत होता. त्याला मिळणाऱ्या हिस्स्याची जमीन नावावर करून द्या, म्हणून वडिलांमागे तगादा लावला होता. मुलाला पैसे व जमीन नावावर करून देण्यास त्यांनी नकार दिला होता.

याच रागातून लक्ष्मणने बुधवारी सकाळी रस्त्याने जात असलेल्या दादू यांच्या अंगावर ट्रॅक्टर घातला. त्यात ट्रॅक्टरखाली चिरडल्याने दादू यांचा जागीच मृत्यू झाला.

मिरज ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. लक्ष्मण आकळेस ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले. वडिलांच्या खूनप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

एरंडोलीत मद्यपी पतीचा भोसकून खून

एरंडोली : येथे दारू पिऊन मारहाण करणाऱ्या पतीचा पत्नीनेच धारदार शस्त्राने भोसकून खून केला. सुभेदार आनंदा काळे (वय ४०) असे मृताचे नाव आहे.

आज सकाळी अकरा वाजता ही घटना घडली. येथील बेघर वसाहतजवळ पारधी वस्तीवर मृत सुभेदार आनंदा काळे (वय ४०) व त्याची पत्नी चांदणी (वय ३५) आरग रस्त्यावर पारधी वस्तीत राहत आहेत.

काल सकाळी ११ वाजता किरकोळ कारणातून दोघांत जोरदार भांडण झाले. सुभेदारने पत्नीला दारू पिऊन मारहाण केली. चाकूने मारण्याचा प्रयत्न केला.

त्यावेळी चिडलेल्या चांदणीने त्याच्याच हातातील चाकू काढून घेऊन त्याच्या पोटात चाकूने भोसकले. हल्ल्यात सुभेदार काळे जागीच मृत झाला. खुनानंतर संशयित चांदणी हिने घटनास्थळावरून पलायन केले.

मिरज ग्रामीण पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यासह पथकाने घटनास्थळी पंचनामा केला. मृतदेह शविच्छेदनासाठी मिरज शासकीय रुग्णालयात पाठविला. मिरज तालुक्यात बुधवारी दोन ठिकाणी खुनाचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. बेडगेमधील खुनानंतर एरंडोलीतही खून झाल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली.

आरेवाडी येथे मारहाणीत जखमी वेटरचा मृत्यू

ढालगाव : आरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथील बिरोबा बनातील हॉटेलबाहेर वेटरनेच वेटरच्या डोक्यात लाकडी फाळकूट घालून खून केला. ही घटना बुधवारी (ता. २४) पहाटे घडली. कवठेमहांकाळ पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. सुरेश कडीमणी (वय ४५, चडचण) असे मृत वेटरचे नाव आहे.

कडीमानी एका हॉटेलमध्ये कामासाठी आला. प्रशांत उबे (माळवाडी, पुणे) तीन दिवसांपासून कामांवर आला होता. किरकोळ कारणावरून उबे व कडीमणी यांच्यात मारामारी झाली. जखमी वेटर सुरेश कडीमाणीचा उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.

मंगळवारी रात्री जेवण देत असताना कडीमाणीने अंडे खायला घेतले. त्यावरून रोटीवाला प्रशांत उबे (वय ४५) याने दारूच्या नशेत कडीमाणीच्या डोक्यात फाळकुटाने मारले. कडीमणीचा मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच मृत्यू झाला.

संशयित प्रशांत पसार झाला आहे. कवठेमहांकाळ पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे. पोलिस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक तपास करीत आहेत.