खंडणीप्रकरणी तिघांना नागठाण्यात अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

नागठाणे - मारहाण करून पाच हजार रुपये मागितल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी तिघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. 

नागठाणे - मारहाण करून पाच हजार रुपये मागितल्याप्रकरणी बोरगाव पोलिसांनी तिघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. 

पोलिसांनी सांगितले, की नरेंद्र रवींद्र बर्गे (रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा), मयूर मुकुंद कांबळे (रा. पिरवाडी, सातारा) व विनायक राजाराम पवार (रा. पाडळी, ता. सातारा) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. संजय बबन पवार (रा. मांडवे, सातारा) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. त्यानुसार काल सायंकाळी ही घटना घडली. संजय पवार हे त्यांच्या दोन चुलत बहिणींसह मोटारीतून निघाले होते. नागठाण्यात नरेंद्र बर्गे, मयूर कांबळे व विनायक पवार यांनी त्यांच्या मोटारीला दुचाकी आडवी लावली. त्यानंतर दुचाकी रस्त्यावर आडवी पाडून "तुमच्यामुळे गाडी पडली. नुकसानभरपाई म्हणून पाच हजार रुपये दे' असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरवात केली. या वेळी संजय पवार यांच्यासोबत असणाऱ्या बहिणींनी असे काही झाले नसल्याचे म्हटल्यावर या तिघांनीही त्यांच्या कारची चावी जबरदस्तीने काढून घेतली. शिवीगाळ, मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा पैशाची मागणी केली. घाबरलेल्या संजय पवार यांनी बोरगाव पोलिस ठाण्यात फोन लावून सहायक पोलिस निरीक्षक संतोष चौधरी यांना घटनेची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक खान, राजू शिखरे व अन्य कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत या तिघांनाही ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणल्यावरही या तिघांचा धिंगाणा सुरूच होता. सहायक फौजदार संजय दिघे पुढील तपास करत आहेत. 

Web Title: Three people were arrested in ransom case

टॅग्स