तीन लुटारूंना दोन पिस्तुलांसह अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 फेब्रुवारी 2019

हुपरी (ता. हातकणंगले) रस्त्यावर गोळीबार करून सराफाला लुटल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.  या प्रकरणी पाच जणांच्या टोळीतील तीन संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल, ३२ जिवंत राउंडसह सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कोल्हापूर - हुपरी (ता. हातकणंगले) रस्त्यावर गोळीबार करून सराफाला लुटल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले.  या प्रकरणी पाच जणांच्या टोळीतील तीन संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल, ३२ जिवंत राउंडसह सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

टोळीतील तिघे सराईत गुन्हेगार असून, गायब झालेल्या दोघांचा शोध सुरू 

असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

विशाल बाळासाहेब रूपनूर (वय २३, रा. खंडेराजुरी, मिरज), भरतेश ऊर्फ गुरू तुकाराम अस्वले (२२, रा. धरणगुत्ती, शिरोळ), निखिल सुरेश जांगडे (२२, रा. नांदणी, शिरोळ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. 

हुपरीतील दत्तात्रय भरमू पुजारी (४८) हे सराफ व्यवसायिक आहेत. ते ऑर्डर घेऊन सोन्याचे दागिने करून देतात. त्यांनी ऑर्डरप्रमाणे सुमारे एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने तयार केले. दागिने घेऊन ते २५ जानेवारीला सायंकाळी मुलगा श्रीरंग यांच्या मोटारसायकलवरून जात होते. रेंदाळ ते कारदगा रस्त्यावरून हुपरीच्या दिशेने जात असताना दोन लुटारूंनी त्यांच्या आडवी मोटारसायकल घातली. त्यांनी त्यांच्याकडील सोन्याचे दागिने असलेली पिशवी मागितली. मात्र, पुजारी यांनी ती देण्यास नकार दिला. त्यामुळे त्यातील एका लुटारूने पुजारी यांच्यावर गोळी झाडली. त्यात ते जखमी झाले. त्यानंतर दोन लुटारूंनी त्यांचे घड्याळ आणि अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. मात्र, त्यांना सोन्याच्या दागिन्यांची पिशवी हिसकावून नेण्यात यश आले नाही. परिसरातील नागरिक जमा झाल्याने लुटारू फरारी झाले होते. गोळीबार करून लुटीच्या घडलेल्या प्रकरणाचा तपास इचलकरंजीच्या स्थानिक गुन्हे शाखा व हुपरी पोलिसांनी सुरू केला. 

स्थानिक गुन्हे शाखा इचलकरंजीचे सहायक पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, हुपरी पोलिस ठाण्याच्या सहायक पोलिस निरीक्षक रिझवाना नदाफ, उपनिरीक्षक अमोल माळी, राजासाब सनदी, सुशीलकुमार गायकवाड, रमेश कांबळे, दीपक कांबळे, यशवंत खाडे, शरद कांबळे, नीतेश कांबळे, सचिन सावंत आदींनी कारवाई केली. या वेळी गडहिंग्लजचे अप्पर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, उपअधीक्षक गणेश बिरादार आदी उपस्थित होते. 

असा लावला छडा  
लुटारूंनी वापरलेली मोटारसायकल इस्लामपूर परिसरात पोलिसांच्या हाती लागली. मोटारसायकल चोरीची असून, ती नरवाड (ता. मिरज) येथील विशाल रूपनूर वापरत असल्याची माहिती तपासात पुढे आली. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.

चौकशीत त्याने भरतेश, निखिलसह संशयित मारुती हेरवाडे (रा. धरणगुत्ती, शिरोळ) आणि अजित ऊर्फ छोट्या अशोक कोळी (रा. नरवाड, ता. मिरज) अशा पाच जणांनी गोळीबार करून सराफाला लुटल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी भरतेश, निखिल यांना अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तूल, तीन जिवंत राऊंडसह एक लाख ४१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तिघांना न्यायालयाने ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. याबाबत मारुती हेरवाडे व अजित कोळी यांचा शोध सुरू असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले. 

संशयित रेकॉर्डवरील 
लुटीतील मुख्य संशयित सूत्रधार विशाल रूपनरवर दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर २२ गुन्हे दाखल आहेत. मारुती हेरवाडेवर जबरी चोरीसारखे चार गुन्हे, अजित कोळीवर मिरज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याची माहिती पुढे आल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Three robbers arrested with two pistols