वसतिगृहाला आगीत तीन विद्यार्थी जखमी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

मलकापूर - आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात काल (ता. 6) मध्यरात्री अचानक आग लागल्याने दोन दुचाकी, सहा सायकलींसह वायरिंग जळून खाक झाले. आग लागल्याचे समजताच धावपळीत तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. नागरिकांसह युवकांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचा अंदाज आहे. 

शहरातील मुख्य रस्त्यालगत शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात 116 विद्यार्थी राहतात. त्यापैकी काल (ता. 6) 99 विद्यार्थी वसतिगृहात होते. रात्री 12 वाजण्याच्या सुमारास अभ्यास करून सर्व विद्यार्थी झोपले. पहाटे पावणेतीन वाजण्याच्या सुमारास वसतिगृहातील तळमजल्यातील पार्किंग व वऱ्हांड्यात आग लागल्याचे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह आसपासच्या युवकांच्या लक्षात आले. आरडाओरडा करून त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना जागे केले. जीना व व्हरांड्यात आग लागल्यामुळे पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरून मिळेल त्या मार्गाने विद्यार्थ्यांनी मुख्य रस्त्यावर धूम ठोकली. या धावपळीत तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. प्रसंगावधान राखून अग्निशामन दलाला फोन करून बोलवण्यात आले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्‍यात आली. तोपर्यंत पार्किंगमध्ये लावलेल्या दोन दुचाकी, सहा सायकलींसह वऱ्हांड्यातील वायरिंग जळून खाक झाले. या आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. पेटलेल्या आगीतही युवकांनी प्रसंगावधान दाखवत स्वयंपाक गृहातील गॅस सिलिंडर बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. 

Web Title: Three students injured in the hostel fire