तीन आठवड्यांत सिग्नल यंत्रणा सुसह्य

तीन आठवड्यांत सिग्नल यंत्रणा सुसह्य

कोल्हापूर - शहराच्या मुख्य मार्गावरील सिग्नल विनाअडथळा पार करता येईल, अशी यंत्रणा उभी करण्यासाठी आज शहर वाहतूक पोलिसांनी ड्रोनसह सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे वाहनांचे सर्वेक्षण केले. गर्दीच्या वेळी दहा ठिकाणी या नोंदी घेण्यात आल्या. हा अहवाल मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असून, तीन आठवड्यांत वाहतूक सिग्नलमध्ये समन्वय साधणारी यंत्रणा उभारण्यात येणार आहे. 

शहरातील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. वाहतूक कोंडीमुळे अपघातांच्या संख्येतही भर पडू लागली आहे. हा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी शहरातील मुख्य मार्गावरील सिग्नलवरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण कक्ष सरसावला आहे. सिग्नलवर विनाअडथळा प्रवास (सिक्रोनायझेशन) चालकांना करता यावा, अशी सिग्नलमध्ये समन्वय साधणारी यंत्रणा उभारण्यात येत आहे. त्यासाठी सिग्नलवरील रस्त्यावरून ये-जा होणाऱ्या वाहनांच्या संख्येचे सर्वेक्षण करण्याची मोहीम आज हाती घेण्यात आली.  

सर्वेक्षणासाठी एक ड्रोन व शहर व परिसरातील पोलिस ठाण्यात बसविण्यात आलेल्या १५ सीसी टीव्ही कॅमेऱ्यांचा वापर करण्यात आला. प्रत्येक पोलिस ठाण्यातील एक कर्मचारी, अधिकारी व शहर वाहतूक पोलिस अशा २२ जणांचे पथक तयार करण्यात आले. सर्वेक्षणासाठी ताराराणी चौक - दाभोळकर कॉर्नर - मलबार चौक - पंचशील हॉटेल चौक - व्हीनस कॉर्नर आणि फोर्ड कॉर्नर - उमा टॉकीज - सावित्रीबाई फुले हॉस्पिटल - गोखले कॉलेज - हॉकी स्टेडियम या चौकांची निवड करण्यात आली. सकाळी १० ते १२ आणि सायंकाळी ५ ते ७ अशा दोन टप्प्यांत हे सर्वेक्षण करण्यात आले. दाभोळकर चौकात ड्रोनसह, इतर ठिकाणी असणाऱ्या उंच इमारतींवर बसविण्यात आलेल्या सीसी टीव्हीद्वारे वाहनांच्या नोंदी  घेण्यात आल्या. रस्त्यावरून किती मोटारसायकल, रिक्षा, मोटारी आणि अवजड वाहनांची ये-जा होते, कोणत्या मार्गावर त्याचा भर आहे, याच्या आकडेवारीचा डाटा घेण्यात आला. त्याचे वाहनांनुसार वर्गीकरण करून प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर तो पुणे येथील अभियंत्यास मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. हे सर्वेक्षण शहर वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली केले जात आहे. 

सिग्नलवर बसवणार मायक्रो चिप
कोणत्याही अडथळ्याविना शहराच्या मुख्य मार्गावरील सिग्नल वाहनचालकाला पार करता यावेत यासाठी सिग्नलवर मायक्रो चिप बसविण्यात येणार आहे. सिग्नलचा टाइमर कमी करून तो २० ते ३० सेकंदांचा करून सर्व सिग्नलमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

बॅरिकेडस्‌ लावण्याचा प्रस्ताव
मिरजकर तिकटी ते देवल क्‍लब चौक आणि रंकाळा चौपाटी ते फुलेवाडी पहिला स्टॉप या मार्गावर बॅरिकेडस्‌ लावण्यात येणार आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव शहर वाहतूक नियंत्रण शाखेने महापालिकेला पाठविला असल्याचे धुमाळ यांनी सांगितले. 

१८ वॉर्डन...
केएसबीपीकडून (कोल्हापूर रस्ते सौंदर्यीकरण प्रकल्प) 
शहर वाहतूक पोलिसांसाठी १८ वॉर्डन देण्यात आले आहेत. वाहतुकीचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी त्यांची शहर वाहतूक शाखेला मदत मिळत आहे. 
शहरातील सिग्नलमध्ये समन्वय साधून वाहतुकीची कोंडी दूर करण्याचा प्रयत्न आहे. त्या आधारे इंधन व चालकांच्या वेळेची बचतही होईल. याबाबत महापालिकेने सर्वेक्षण केले आहे. त्याच्या अपेक्षित खर्चाचे २३ लाखांचे बजेट मंजुरीसाठी महापालिकेने सादर केले आहे. 
- अशोक धुमाळ (पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com